सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना नजरकैद करण्याचा आदेश दिला आहे. 2022 च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभवानंतरही सत्तेवर कायम राहण्यासाठी सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बोल्सोनारो यांनी यापूर्वीच्या खबरदारीदाखल निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
बोल्सोनारो यांनी स्वत:च्या तीन खासदार पुत्रांद्वारे सार्वजनिक संदेश पाठविले, हा प्रकार निर्बंधांचे उल्लंघन करणारा असल्याचे याप्रकरणाची देखरेख करणारे न्यायाधीश अलेक्जेंड्रे डि मोरायस यांनी म्हटले आहे. बोल्सोनारो यांनी रविवारी रियो डी जेनेरियामध्ये समर्थंकांच्या एका सभेला स्वत:च्या पुत्राच्या फोनद्वारे संबोधित केले होते.
बोल्सोनारो यांचे कृत्य नियमांची अवहेलना करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर न्यायालयाने बोल्सोनारो यांना घरात नजरकैद करणे, इलेक्ट्रॉनिक एंकल मॉनिटर परिधान करणे आणि त्यांच्या घरातील सर्व मोबाइल जप्त करण्याचा आदेश दिला.
सत्तापालटाच्या कटाचे प्रकरण
बोल्सोनारो यांनी निवडणुकीत पराभव झाल्यावरही सत्ता टिकविण्यासाठी संसदेवर हल्ल्याचा कट रचला होता असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. तसेच बोल्सोनारो यांनी वर्तमान अध्यक्ष लूला डी सिल्वा आणि न्यायाधीश डि मोरायस यांच्या हत्येचा कट रचला होता. सैन्य सत्तापालटाद्वारे निवडणूक निकाल पालटविण्याचा प्रयत्न बोल्सोनारो यांनी केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी बोल्सोनारो यांच्यावर रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती आणि एंकल मॉनिटर परिधान करण्याचा आदेश दिला होता.
ट्रम्प यांचा हस्तक्षेप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील न्यायालयाच्या निर्णयाला सूडाची कारवाई ठरविले आहे. तसेच ट्रम्प यांनी ब्राझीलवर 50 टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर ट्रम्प यांच्या या प्रकरणातील हस्तक्षेपानंतर ब्राझीलमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सर्व राजकीय पक्षांनी ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला आहे. दुसरीकडे बोल्सोनारो यांचे पुत्र फ्लावियो यांनी न्यायालयावर हुकुमशाहीचा आरोप केला आहे.









