उत्तराखंडात गाजलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात निर्णय
वृत्तसंस्था / देहराडून
उत्तराखंड राज्यात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे निलंबित करण्यात आलेले नेते विनोद आर्य यांचा पुत्र पुलकित आर्य याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी दोन आरोपींनाही गजाआड पाठविण्यात आले आहे.
हा निर्णय उत्तराखंडातील कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. शिक्षा झालेल्या अन्य आरोपींची नावे सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता अशी आहेत. प्रत्येक आरोपीला आजन्म कारावासाच्या शिक्षेसमवेतच प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
हे 2022 मधील प्रकरण आहे. उत्तराखंड राज्यातील पौडी येथील वनंत्रा नामक रिझॉर्टवर अंकिता भंडारी व्यवस्थापिकेचे काम करीत होती. तिने या रिझॉर्टवर वास्तव्यास येणाऱ्या महनीय व्यक्तींना ‘अतिरिक्त सेवा’ द्यावी, असा दबाव तिच्यावर आणण्यात आला होता. तिने अशी सेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी तिची हत्या केली होती. पुलकित आर्य हा या रिझॉर्टचा मालक होता. तर अन्य दोन आरोपी तेथे काम करणारे कर्मचारी होते. 18 डिसेंबर 2022 या दिवशी 19 वर्षांची अंकिता भंडारी बेपत्ता झाली होती. त्यानंतर 24 डिसेंबर 2022 या दिवशी तिचा मृतदेह हाती लागला होता. पुलकित आर्य आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर तिची हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह हृषिकेश येथील एका कालव्यात फेकून दिल्याचा आरोप होता. या घटनेनंतर दोन वर्षे आठ महिन्यात या प्रकरणी सत्र न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे.
विशेष तपास दलाची स्थापना
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तराखंड सरकारने विशेष तपास दलाची स्थापना केली होती. या दलाने चौकशीनंतर 500 पानांचे आरोपपत्र सादर केले. पुलकित आर्य आणि त्याचे दोन कर्मचारी यांनीच ही हत्या केली, असे तपास दलाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्यावर अभियोग चालविण्यात आला. मधल्या काळात पुलकित आर्यचे पिता विनोद आर्य यांना भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आले होते. 18 डिसेंबरला अंकिता भंडारी ही एकटीच तीन्ही आरोपींसमवेत हृषिकेशला गेली होती. रात्री आठच्या आसपास हे तिघे एका कालव्याजवळ थांबले होते. तिन्ही आरोपींनी तेथे मद्यपान केले. यावेळी त्यांचे अंकिता हिच्याशी कडाक्याचे भांडण झाले. रिझॉर्टवर चालणाऱ्या गैरप्रकारांविषयी आपण माहिती उघड करु, असा इशारा अंकिता हिने या तीन आरोपींना दिला असे तपासात निष्पन्न झाले आहे. या इशाऱ्यामुळे संतप्त होऊन आरोपींनी तिची हत्या करत तिचा मृतदेह कालव्यात फेकला होता.









