वृत्तसंस्था/ कॅनबेरा
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू तसेच सलामीचे फलंदाज इयान रेडपाथ यांचे रविवारी येथे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. 1964 ते 1976 या कालावधीत रेडपाथ यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
इयान रेडपाथ यांनी आपले कसोटी पदार्पण दक्षिण आफ्रिका संघविरुद्ध मेलबर्नमध्ये केले होते. पदार्पणातील पहिल्या सामन्यात रेडपाथ यांनी 97 धावा झळकाविल्या होत्या. रेडपाथ यांनी 66 कसोटी आणि 5 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. 1969 साली सिडनी मैदानावर विंडीज संघाविरुद्ध रेडपाथ यांनी कसोटीतील आपले पहिले शतक झळकविले होते. विंडीजच्या वेगवान तोफखान्यासमोर रेडपाथ यांनी 132 धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये रेडपाथ यांनी 7 शतके झळकावली असून 1970 साली पर्थ येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी 171 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. 1975 साली इयान रेडपाथ यांच्या ऑस्टेलियन क्रिकेट क्षेत्रातील भरीव योगदानामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळातर्पे रेडपाथ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









