वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू तसेच माजी ऑलिम्पिक हॉकीपटू ब्रायन बुथ यांचे वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती शनिवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली.
ब्रायन बुथ यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 29 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले असून दोन सामन्यात त्यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते. कसोटी क्रिकेटमध्ये बुथ यांनी पाच शतके झळकवताना 42.21 धावांच्या सरासरीने 1773 धावा जमवल्या आहेत. 1960 च्या दशकामध्ये बुथ यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. 1956 च्या मेलबोर्न ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघामध्ये ब्रायन बुथ यांचा समावेश होता. 1962 साली त्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात मध्यफळीत खेळताना शतक झळकवले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे ब्रायन बुथ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









