मेलबर्न/ वृत्तसंस्था
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत पहिले त्रिशतक झळकवणारे ऑस्ट्रेलियाचे माजी डावखुरे फलंदाज बॉब काऊपर यांचे रविवारी आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.
1964 ते 1968 या कालावधीत काऊपर यांनी 27 कसोटीत 48.84 च्या सरासरीने विक्रमी 2061 धावा जमविल्या. त्यात पाच शतकांचा समावेश होता. याशिवाय पार्टटाईम ऑफस्पिन गोलंदाजी करीत त्यांनी 36 बळीही मिळविले होते. संयमी फलंदाजी आणि फटकेबाजीसाठी ते ओळखले जात. फेब्रुवारी 1966 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्यांनी 12 तास फलंदाजी करीत 589 चेंडूंचा सामना करीत 307 धावा जमविल्या होत्या. त्यांची ही खेळी खूपच गाजली होती. 20 व्या शतकात ऑस्ट्रेलियात नोंदवलेले ते एकमेव त्रिशतक होते. त्यावेळचे ते एकूण दहावे त्रिशतक होते. आधीच्या कसोटीत ते बारावा गडी होते. पण पुढच्या कसोटीत त्यांना संघात स्थान दिले गेले आणि ती प्रसिद्ध खेळी केली. ऑस्ट्रेलियन भूमीत ते भक्कम फलंदाजी करीत. 75.78 अशी त्यांची मायदेशातील दुसऱ्या क्रमांकाची सरासरी होती. सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदला होता.
1968 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि स्टॉकब्रोकरचे काम करू लागले. नंतर आयसीसीचे सामनाधिकारीही झाले होते. क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. काऊपर यांच्या पश्चात पत्नी डेल व ऑलिव्हिया व सेरा अशा दोन मुली आहेत.









