वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे तसेच कुशल क्रिकेट प्रशासक, माजी अष्टपैलु कसोटी कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांचे सिडनीमध्ये वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले.
जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये ऑस्ट्रेलियाचा दर्जा अव्वल करण्यासाठी बॉब सिम्पसन यांचे योगदान मोलाचे असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीमध्ये म्हटले आहे. 1990 च्या दशकामध्ये सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियन संघाला जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये अव्वल स्थानावर नेले. 1957 ते 1978 या 21 वर्षांच्या क्रिकेट कालावधीत सिम्पसन यांनी 62 कसोटी 4869 धावा जमविल्या असून त्यामध्ये 10 शतके, 27 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्यांची 311 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सिम्पसन यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर कसोटीत 71 गडी बाद केले आहेत. कसोटीमध्ये त्यांनी 57 धावांत 5 ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी केली. सिम्पसन यांनी द. आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपले कसोटी पदार्पण केले होते. सिम्पसन हे स्लिपमधील जागतिक दर्जाचे क्षेत्ररक्षक म्हणून परिचित होते. 1968 साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली पण त्यानंतर त्यांची 1971 साली ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदी (त्यांच्या वयाच्या 41 व्या वर्षी) नियुक्ती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली होती. 1977 साली झालेल्या विश्व मालिका क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. 1978 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाकडून दोन वनडे सामने खेळताना 36 धावा आणि 2 गडी बाद केले होते. 39 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 12 सामने जिंकले असून 12 सामने गमविले तर 15 सामने अनिर्णीत राखले.
क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे ते प्रमुख यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. 1996 साली त्यांनी प्रशिक्षक क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. बॉब सिम्पसन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्राला स्टीव्ह वॉ, डेव्हिड बून, डीन जोन्स, क्रेक मॅकडरमॉट या सारखे दर्जेदार क्रिकेटपटू लाभले. ऑस्ट्रेलियाच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सिम्पसन यांना श्ा़dरद्धांजली वाहिली.









