सुखबीर सिंह बादलांवर होते नाराज
वृत्तसंस्था/ चंदीगड
शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार अमरपाल सिंह बोनी अजनाला यांनी आणखी दोन नेत्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजनाला यांनी अलिकडेच अकाली दलाला रामराम ठोकला होता. अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर अजनाला हे नाराज होते. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अजनाला यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले आहे. शिअद नेते विक्रम सिंह मजीठिया यांच्यासोबत झालेल्या राजकीय वादानंतर अजनाला यांनी शनिवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
अकाली दलाचे माजी खासदार रतन सिंह अजनाला यांचे ते पुत्र आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाला दुसऱयांदा रामराम ठोकला आहे. 2007 आणि 2012 मध्ये म्हणजेच दोनवेळा ते अजनाला मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये अजनाला यांनी शिरोमणी अकाली दल (टकसाली)मध्ये प्रवेश करण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.









