पुणे / प्रतिनिधी :
Formation of storm ‘Mandos’ in Bay of Bengal बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी रात्री ‘मॅन्दोस’ या चक्रीवादळात रुपांतर झाले. उद्या (गुरुवारी) सकाळपर्यंत हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश ते उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या अलर्टमुळे नौदल, लष्कर तसेच एनडीआरएफचा ताफा सज्ज करण्यात आला आहे.
अंदमानच्या समुद्रात काही दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. हे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने सरकत बंगालच्या उपसागरात उतरले आहे. याची तीव्रता वाढली असून, हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीच्या दिशेने ताशी 15 किमी वेगाने प्रवास करीत आहे. या क्षेत्राचे बुधवारी रात्री वादळात रुपांतर होण्याचा, तर गुरुवारी सकाळी ते किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तामिळनाडू तसेच आंध्र किनारपट्टीला ऑरेंज, तर शुक्रवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे.
अधिक वाचा : राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
हे वादळ पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार आहे. जमिनीवर आल्यानंतर याचा प्रभाव कमी होईल. दरम्यान, स्थानिक प्रशासनाला अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना आहे.