तब्बल 45 दिवस चालणाऱ्या आणि 48 सामन्यांचा समावेश असणारी वनडे विश्वचषक स्पर्धेला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघातील सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. मात्र, अनेक क्रिकेटप्रेमी असेही आहेत, ज्यांना वनडे विश्वचषकाच्या 13 व्या हंगामातील बऱ्याच गोष्टी माहित नाही आहेत. जसे की, स्पर्धेचा फॉरमॅट, नियम आणि वेळापत्रक. याचाच घेतलेला थोडक्यात आढावा
भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. याशिवाय, टीम इंडियाचा दुसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. खरं तर, हा सामना सुरुवातीला 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याच्या तारखेमध्ये बदल करत एक दिवस आधी खेळवला जाईल. खरं तर, हा सामना जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.
विश्वचषकातील एकूण 10 संघ
वनडे विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश असणार आहे. या 10 संघांमध्ये यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
विश्वचषकातील सामने होणारी ठिकाणे
वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी 10 शहरे निश्चित करण्यात आली आहेत. अहमदाबाद, हैदराबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बेंगळूर, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच, या 10 शहरांतील एकूण 10 ठिकाणांवर विश्वचषकातील 48 सामन्यांचे आयोजन होणार आहे. या 10 स्टेडिअममध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअम, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम, अरुण जेटली स्टेडिअम, एमए चिदंबरम स्टेडिअम, भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम, एम चिन्नास्वामी स्टेडिअम, वानखेडे स्टेडिअम आणि ईडन गार्डन्स यांचा समावेश आहे.
विश्वचषकाचा फॉरमॅट- राऊंड रॉबिन
विश्वचषक स्पर्धेत सर्व संघ इतर 9 संघांविरुद्ध राऊंड रॉबिन पद्धतीने खेळतील. म्हणजेच, प्रत्येक संघाला इतर 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळावा लागेल. यांमधील गुणतालिकेत जे संघ अव्वल 4 स्थानावर असतील, त्यांना उपांत्य सामन्यात जागा मिळवता येईल. तसेच, येथे विजय मिळवणारा संघ पुढे अंतिम सामन्यात एकमेकांचा सामना करतील.
राऊंड रॉबिन फॉरमॅट आहे तरी काय
राऊंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राऊंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानले जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
राऊंड रॉबिन पद्धतीमध्ये भारताची कामगिरी
राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामिगिरी निराशाजनक आहे. 1992 मध्ये प्रथमच राऊंड रॉबिन स्पर्धा रंगली होती, तेव्हा भारतीय संघाला टॉप 4 मध्ये स्थान पटकावता आले नव्हते. तर 2019 मध्ये भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. यंदा भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे, त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विश्वचषकातील नियम
- विश्वचषकामध्ये प्रत्येकी 45 मिनिटांच्या ब्रेकने 3.5 तासांचे 2 सत्र असतील.
- नाणेफेक झाल्यानंतर संघांचे कर्णधार त्यांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगतील.
- प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त 10 षटके टाकण्याची परवानगी (पावसाच्या व्यत्ययाने सामना कमी षटकांचा झाला, तर प्रत्येक गोलंदाज एकूण षटकांपैकी 20 टक्के षटके टाकू शकतो.)
क्षेत्ररक्षण निर्बंध आणि पॉवरप्ले
- एका डावाच्या पहिल्या 10 षटकांमध्ये (अनिवार्य पॉवरप्ले), क्षेत्ररक्षण करणारा संघ 30-यार्ड वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त दोन क्षेत्ररक्षक ठेवू शकतो. (हे पॉवरप्ले दरम्यान फक्त आक्रमण फील्ड सेट करण्याची परवानगी असेल.)
- सामन्यात 11 आणि 40 षटकांच्या दरम्यान चार क्षेत्ररक्षक 30-यार्ड वर्तुळाबाहेर थांबू शकतात. (दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये एकतर अटॅकिंग किंवा नॉर्मल फील्ड सेट केले जाऊ शकते.)
- अखेरच्या 10 षटकात, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला 30-यार्ड वर्तुळाबाहेर 5 क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी असेल.
- तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये तिन्ही प्रकारची फील्ड (आक्रमक, बचावात्मक आणि सामान्य फील्ड) वापरली जाऊ शकते.
- तीन पॉवरप्ले अनुक्रमे झ्1, झ्2 आणि झ्3 द्वारे दाखवले जातात. सामान्यत: आधुनिक स्कोअरकार्डमध्ये स्कोअरच्या जवळ हे दाखवले जाते.
- दुसऱ्या संघाने सर्व विकेट्स गमावल्यावर किंवा सर्व षटके संपल्यानंतर दोन्ही संघांनी केलेल्या धावांची संख्या समान असल्यास, खेळ टाय घोषित केला जातो. (दोन्ही संघाने गमावलेल्या विकेट्सची पर्वा न करता).
- सामना टाय झाल्यास, बादफेरी आणि अंतिम सामन्यासाठी सुपर ओव्हर टाकली जाईल.
- जर हवामानाच्या परिस्थितीमुळे सामनाधिकाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी खेळ थांबवावा लागला, तर सामना त्याच्या राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलला जाईल. (केवळ उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी)
- राखीव दिवस नसलेल्या सामन्यांसाठी, सामन्याचा विजेता निश्चित करण्यासाठी डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
बादफेरीतील सामन्यांचे नियम
- जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना कोलकाता येथे खेळवला जाईल.
- जर भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर त्यांचा सामना पाकिस्तानविरुद्ध न होता मुंबईत होईल. जर भारत-पाकिस्तान आमने-सामने आले, तर उपांत्य सामना कोलकाता येथे खेळला जाईल.
कुठे पाहता येणार स्पर्धा?
वनडे विश्वचषक स्पर्धेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 आणि दुपारी 2 वाजता खेळले जाणार आहेत. ज्या दिवशी दोन सामने असतील, तेव्हा या वेळी सामने खेळले जातील. तसेच, ज्या दिवशी एक सामना असेल, त्या दिवशी 2 वाजता सामना खेळला जाईल. एकूण 45 दिवस खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर दिसतील. तसेच, मोबाईलवर हॉटस्टार या अॅपवर सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहता येईल.
विश्वचषकातील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर- भारत वि. अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड, धरमशाला
29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर- भारत वि. श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड, बेंगळूर
15 नोव्हेंबर- पहिला उपांत्य सामना, मुंबई
16 नोव्हेंबर- दुसरा उपांत्य सामना, कोलकाता
19 नोव्हेंबर- अंतिम सामना, अहमदाबाद









