पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली आहे. 25 वर्ष त्यांनी पक्ष उभारणीचे काम केले आहे. त्यामुळे पक्षावर कुरघोडीचे राजकारण न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ नावाने पक्षाची निर्मिती करावी. त्याचप्रमाणे आपण नेमके हिंदुत्ववादी की पुरोगामी विचारसरणीचे आहोत ही भूमिकाही एकदा स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
याबाबत बोलताना लवांडे म्हणाले, शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यावेळी जनता पक्ष सहभागी झाला होता. त्यामध्ये भाजपचे नेते नव्हे; तर समाजवादी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. मात्र, याबाबत अनेकांचे गैरसमज असून चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील सभेत 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर तीन ते चार दिवसातच पक्ष फुटतो, यामागे भाजपचे कुटील राजकारण दिसून येत आहे. पक्षातून फुटून गेलेल्या विविध नेत्यांकडून मूळ पक्षातील नेत्यांवर विविध आरोप होणे ही बाब चुकीची आहे.
दिशाभूल करणारे आरोप करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जो हैदास सुरू आहे, त्यामुळे सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडत आहे. सत्ता संघर्ष राज्यात नवीन नाही. परंतु, दोन विचार प्रवाहांचा संघर्ष हा हजारो वर्षाचा असून, तो एकत्रित येऊ शकत नाही, असेही लवांडे यांनी नमूद केले.








