लोकसभेची निवडणूक मी कोठून लढविणार आहे हे वेळच सांगेल – संभाजीराजे
कोल्हापूर प्रतिनिधी
आजतागायत विधानसभा निवडणूक लढविणे हे स्वराज्य पक्षाचे टार्गेट होते. पण आता लोकसभा निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात राहणार आहे. लोकसभेचे वातावरण तापलेले आहे. अद्याप उमेदवारीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या ‘वेट अँड वॉच’ चे धोरण आहे. किती जागा लढविणार हे देखील अजून ठरलेले नाही. पण 2009 च्या जुन्या जखमा अजून पुसलेल्या नाहीत. त्या अजून लक्षात ठेवल्या आहेत. वेळ प्रसंगी त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असा गर्भित इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी शनिवारी दिला. या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीराजे कोणती भूमिका घेतात ? आणि त्यांचा रोख नेमका कोणावर आहे ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी आमदार पी.एन.पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहात काय ? असा प्रश्नाबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, राज्यात किती जागा लढवायच्या, कोठून लढवायच्या हे अद्याप ठरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर महाविकास आघाडी अथवा महायुती आमच्याशी चर्चा करणार असेल, तर सर्वांसाठी दारे खुली आहेत. मी कोठून निवडणूक लढवणार हे वेळच सांगेल. मी लढण्यापेक्षा स्वराज्य पक्ष मुख्य प्रवाहात राहणार आहे. मग ते कोल्हापूरात उमेदवारी घ्यायची अथवा नाशिक किंवा संभाजीनगरमध्ये हे त्या-त्या वेळी ठरवले जाईल. पुर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. कोठून किती प्रेम मिळतय हे पाहून स्वराज्य पक्ष निर्णय घेईल. पक्षाचे प्रामाणिकपणे काम सुरु आहे. प्रत्येकांना स्वराज्य पक्ष पाहिजे आहे असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
पी.एन.पाटील यांना संभाजीराजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत म्हटल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत काय ? याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले, आमदार पी.एन.पाटील आणि आमचे घरचे संबंध आहेत. त्यांचा 6 जानेवारी तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा 7 जानेवारीला वाढदिवस आहे. त्यामुळे या कुंडलीतील योगायोग देखील म्हणावा लागेल असे संभाजीराजे यांनी सांगितले.









