पुणे / प्रतिनिधी :
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्य आंदोलनात दिलेले योगदान तसेच स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तशी इतिहासात नोंद आहे. मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य आंदोलन काळात 11 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. देशाच्या फाळणीस कडाडून विरोध करणारे ते प्रखर राष्ट्रवादी मुस्लीम नेते होते. हिंदू-मुस्लीम ऐक्य, बहुविविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यास घेतलेले अव्वल दर्जाचे नेते होते. अशा स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आणि त्यांचा जन्मदिवस ‘11 नोव्हेंबर’ या राष्ट्रीय शिक्षण दिनाचा महाराष्ट्र शासनाला विसर पडणे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा देणारे आहे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामान्य प्रशासन विभाग यांचे परिपत्रक क्र. जपुति 2201/प्र.क्र.112/कार्या.29, दि. 31.12.2021 चे परिशिष्ट वाचण्यात आले. यात महाराष्ट्र शासनाने सन 2022 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन आहेत. यामध्ये संत, महाराज, सुधारक, स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर तसेच मान्यवर राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. मात्र, स्वातंत्र्यसेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाचा विसर पडलेला दिसतो, असे देखील तांबोळी म्हणाले.
केंद्र शासनाने सन 2008 पासून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस, 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. गेल्या पाच-सात वर्षांपासून राष्ट्रीय शिक्षण दिनाबद्दल शासन उदासीन असल्याचे निरिक्षण आहे. मौलाना आझादांची या पध्दतीने उपेक्षा होणे, हे एका देशभक्तावरील अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने संबंधित परिशिष्टात सुधारणा करून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाचा आणि 11 नोव्हेंबर या राष्ट्रीय शिक्षण दिनाचा समावेश करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने आम्ही शासनास करत आहोत.