कोट्यावधीची वसुली थकीत, माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
बेळगाव : गावच्या विकासाबरोबरच जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पाणीपट्टी व घरपट्टी वसुली करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मात्र काही कुचकामी अधिकाऱ्यांमुळे वसुली करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसतो. सध्या जिल्ह्यात तशीच अवस्था निर्माण झाली आहे. आपली संपत्ती आपला कर या योजनेचा नव्या अधिकाऱ्यांना विसर पडला असून आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोट्यावधीची वसुली थकीत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती विचारण्यासाठी गेले असता अधिकारी टाळाटाळ करत आहेत. 2015 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा चोळण यांनी ‘आपली संपत्ती आपला कर’ ही योजना सुरू केली होती. जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींनी सुऊवातीच्या काळात ही योजना प्रभावीपणे राबविली. मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष होत गेल्याने ही योजना बारगळल्याचेच दिसून येत आहे. कोट्यावधीची घर आणि पाणीपट्टी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ही योजना पुन्हा प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांचाही जनजागृतीत सहभाग
जिल्ह्यात ज्याप्रमाणे शौचालय चळवळ योजना लागू केली आहे. त्याप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टी योजना राबविली होती. यासाठी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या सदस्यांबरोबरच संबंधित अधिकारीही या योजनेत सहभागी होऊन जनजागृतीही केली होती.
ग्राम पंचायत-अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात 500 हून अधिक ग्राम पंचायतींमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. मात्र त्या यशस्वी होताना दिसून येत नाहीत. आमची संपत्ती आमचा कर ही नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टिकोनातून सुऊवातीच्या काळात ही योजना राबविली होती. या योजनेतून तालुक्याबरोबरच जिल्ह्यात सर्वत्रच जनजागृती केली होती. यासाठी एका विशेष पथकाची नियुक्तीही केली होती. मात्र याकडे ग्राम पंचायत तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या योजनेतून घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यास गावचा विकास कसा होईल? यावर भर दिला होता. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एका विशेष समितीची स्थापना करून जनजागृती वसुली ही दोन्ही कामे केली जात होती. यासाठी जि. पं. ता. पं. व ग्राम पंचायत सदस्यांना घेऊन जनजागृती करण्यात आली. सुऊवातीच्या काळात सर्व अधिकारी व सदस्य कामाला लागले होते. त्यानंतर मात्र त्याकडे त्यांनी पाठ फिरली. यामुळे ही योजना अखेर बारगळली. मात्र जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती सुरू केल्यास त्याचा फायदा होणार आहे.
जनतेनेही जागृत राहणे महत्त्वाचे
घरपट्टी व पाणीपट्टी ही त्या मानाने फारच कमी असते. तरी देखील बहुसंख्यजण पुढील वषी घरपट्टी भरू, असे म्हणून चालढकल करत असतात. यामुळे ग्राम पंचायतीच्या कामात व्यत्यय निर्माण होवू शकतो, याची जाणीवही ठेवणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळा थकीत ग्राम पंचायती म्हणूनही शिक्कामोर्तब होतो. तेव्हा जनतेनेही जागृत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा अशा योजना कितीही राबविल्या तरी त्या अपयशी ठरण्यास वेळ लागणार नाही. दरम्यान या योजनांकडे नव्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत असल्याचे दिसून येते.
ग्राम पंचायतीच्या कराला बगल द्यायची, हे योग्य नाही
घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याकडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष आणि याचा ग्राम पंचायतीवर होणारा परिणाम यादृष्टिकोनातून ही योजना राबवून कर वसुलीवर भर दिला जात होता. कर का भरला पाहिजे? याची माहिती नागरिकांना देण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही योजना आता पूर्णपणे बारगळल्याचेच दिसून येत आहे. कारण जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींची थकबाकी पाहता या योजनेचा बोजवारा उडाला आहे. वास्तविक सर्वसामान्य जनतेनेही घरपट्टी व पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. कारण ग्राम पंचायतीच्या माध्यमातून विकास व्हायचा असेल तर जनतेनेही सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ सोयी-सुविधा मागायच्या आणि आपण मात्र ग्राम पंचायतीच्या कराला बगल द्यायची, हे योग्य नाही.









