खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचे प्रतिपादन : खानापुरात तिरंगा यात्रेची सांगता : भारतीय सैनिकांच्या साहस-धैर्याचे कौतुक
खानापूर : भारतीय सैनिकांच्या योगदानामुळे देशाच्या सीमा आणि देशातील नागरिक सुरक्षित आहेत. भारतीय सैन्याने जो पराक्रम सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून दाखवलेला आहे. यामुळे संपूर्ण जगात भारताबद्दलची प्रतिमा वेगळी तयार झालेली आहे. यासाठी पंतप्रधानांनी सैन्याला सर्व बाबतीत निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. त्यामुळे सैन्याने आपले साहस दाखवून सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. यासाठीच सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी देशात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. यापुढे देशात देशविरोधी कारवाई करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे वक्तव्य खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी खानापूर येथे आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
खानापूर भाजपच्या वतीने शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता येथील बसवेश्वर चौकातून बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली. आंबेडकर गार्डन येथे पोहचल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तेथून राजा शिवछत्रपती स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा खानापूर शहरातील विविध मार्गांवर फिरून चौराशी मंदिर येथे आल्यावर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा यात्रेत आजी-माजी सैनिक, महिला, भाजप कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









