प्राचार्य बी. एल. मजुकर यांचे प्रतिपादन : लोकमान्य ग्रंथालयात बुलकची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
कन्याकुमारी ते गुजरातपर्यंत पसरलेला पश्चिमघाट जैविक विविधतेने अमूल्य व दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी-पक्ष्यांनी समृद्ध आहे. मात्र, सततच्या वृक्षतोडीमुळे ही संपदा धोक्मयात आली असून त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे विचार जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी व्यक्त केले.
लोकमान्य ग्रंथालयात बुलकच्या बैठकीत ‘पश्चिम घाट ः आपला श्वास’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम घाटाचा मोठा हिस्सा कर्नाटकात असून हा डोंगर जंगल, कीटक, जंतू, गवत आणि दुर्मीळ प्रजातींनी भरला आहे. हे नैसर्गिक वैभव देशात इतरत्र नाही. आज जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कडक नियमांचे पालन करून जंगलात जाता येते. पण नियम तोडल्यास कारावासाची शिक्षा होते.
भावी पिढीला शुद्ध हवा मिळण्यासाठी वनसंपदेचे संवर्धन आवश्यक
मधमाशी तिचे अद्भूत काम करते. तिच्यासह कीटकांमुळे होणारे परागीभवन आपण सांभाळले पाहिजे. औद्योगिकीकरण, सांडपाणी, वृक्षतोड यामुळे नद्या प्रदूषित होऊन जमीन नापीक होत आहे. परिणामी वनस्पतीची वाढ खुंटते आहे. औषधांची बेछूट फवारणी, घराच्या परिसरातील गवत काढणे, मधमाशांना मारणे अशारीतीने मनुष्य निसर्गाचा समतोल बिघडवत आहे. तर प्राणी आणि वनस्पती परस्परांना साथ देत जगताना दिसतात. भावी पिढीला शुद्ध हवा-पाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी वनसंपदेचा हा ठेवा जपायला हवा, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी अनेक चित्रांतून हा खजिना उलगडला.
याप्रसंगी किशोर काकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रक्षा प्रभू हिने प्रार्थना सादर केली. अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी मजुकर यांना पुस्तके भेट दिली.









