दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का?
बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील धोकादायक स्थितीतील झाडे हटविण्यात यावीत, अशी मागणी केली जात असली तरी प्रत्यक्षात झाडे हटविण्यासंदर्भात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वनखात्याला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अयोध्यानगर येथील ट्रॅफिक सिग्नलनजीक रस्त्याच्या कडेला एक जुनाट वृक्ष पूर्णपणे वाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे तो कधीही कोसळण्याच्या परिस्थितीत असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही पर्यावरणप्रेमी व समाजसेवकांनी सदर धोकादायक झाडाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल केले आहेत. मात्र, संबंधित झाड हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वादळी वारा व पाऊस झाल्यास सदर धोकादायक झाड कधीही कोसळू शकते. या मार्गावर दररोज मोठी वर्दळ असते. त्यामुळे झाड कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्यावतीनेदेखील शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून तातडीने झाडे हटविण्यात यावीत, अशी सूचना करण्यात आली असली तरीदेखील वनखात्याने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.









