भरपाईपासून शेतकरी वंचित, सर्क्हे करण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतीकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने सर्व्हे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे. अलीकडे वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या शेती पिकांचे नुकसान होत आहे. विशेषत: गवी रेडे, डुक्कर, मोर, तरस आदी प्राण्यांकडून नुकसान झाले आहे. तालुक्मयातील कट्टणभावी, बंबरगा, कुरिहाळ, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, धामणे एस, कुद्रेमनी आदी भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वन्य प्राणी उभ्या पिकांत हैदोस घालून पिके भुईसपाट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. अलिकडे वन्य प्राण्यांची संख्या वाढल्याने नुकसानदेखील वाढले आहे. त्यामुळे वनखात्यानेदेखील नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. विशेषत: पाऊस कमी झाल्यानंतर वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान वाढत आहे. धामणे एस येथील सहा एकर परिसरातील ऊसपीक हत्तीने फस्त केला आहे. त्याबरोबर बंबरगा, कट्टणभावी परिसरातील तीन एकर जेंधळा पिकांत गव्यांनी धुडगूस घालून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान वनखात्याकडून सदर पिकांचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतीचा सर्व्हे करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित आहे.
डोंगराजवळील शेती धोक्यात
अलीकडच्या काही वर्षात वन्य प्राण्यांची संख्या दरवषी वाढू लागली आहे. त्यामुळे डोंगराजवळ असलेली शेती धोक्मयात येऊ लागली आहे. उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या शोधात वन्य प्राणी उभ्या पिकांत तळ ठोकत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना शेती नकोशी झाली आहे. कट्टणभावी, बंबरगा डोंगरपरिसरात तब्बल पन्नास गव्यांचा कळप रात्रीच्यावेळी फिरत आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा कायमस्वऊपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









