वनक्षेत्रात प्रवेश केल्यास कडक कारवाईचा इशारा : रिल्स बनवणाऱ्या युवकांना समज
खानापूर : तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात वर्षाऋतूत नैसर्गिक धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे वर्षापर्यटनासाठी बेळगाव, गोवा, हुबळी, धारवाड यासह इतर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्ग पाहण्यासाठी येतात. मात्र संपूर्ण जंगल परिसर हा संरक्षित वनक्षेत्र असल्याने तसेच जंगलात अत्यंत धोकादायक रस्ते आणि प्राण्यांचे हल्ले होण्याची शक्यता असल्याने वनखात्याने सर्व धबधब्यांच्या ठिकाणी आणि जंगलात प्रवेश करण्यास सक्तमनाईचे आदेश बजावले आहेत. मात्र काही युवा पर्यटक आदेशाचे पालन न करता जंगलात प्रवेश करत आहेत. नुकतेच काही पर्यटकांना वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर ताकीद देवून सोडून देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.
अनेक धबधबे धोकादायक
तालुक्यातील दुर्गम भागात अतिशय घनदाट जंगलात चापोली गावाजवळ वज्रपोहा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी काही तरुण वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून आडमार्गाने या धबधब्यापर्यंत पोहचले होते. या ठिकाणी त्यांनी रिल्स बनवून समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. वनखात्याच्या बेंगळूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास रिल्स आल्यावर त्यांनी खानापूरच्या वनाधिकाऱ्यांना नोटीस देवून याबाबत माहिती मागविली आहे. त्यामुळे वनखात्याने या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना ताकीद देवून सोडून दिले आहे. तालुक्यातील अनेक धबधबे धोकादायक जागेत आहेत. या ठिकाणी पोहचणे अत्यंत कठीण आणि धोकादायक आहे. गेल्या दोन-तीन वर्षात काही दुर्घटना झालेल्या आहेत. काहीनी जीवही गमावलेला आहे. यासाठी वनखात्याने नाका उभारुन जंगलात प्रवेश करण्यास बंदी केली आहे.त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक परिस्थितीत जंगलात प्रवेश करू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.
पर्यटकांनी जंगलात प्रवेश करू नये : वनाधिकारी श्रीकांत पाटील
खानापूर विभागाचे वनाधिकारी श्रीकांत पाटील ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, तालुक्यातील पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आणि धबधबे वर्षाकाळात निर्माण होतात. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आडमार्गाने जंगलात प्रवेश करत आहेत. हे अत्यंत धोक्याचे आहे. या जंगलात अस्वल, बिबटे, वाघ यासह इतर प्राणी मोठ्या प्रमाणात वावरतात. त्यामुळेही धोका आहे. तसेच घनदाट जंगल असल्याने आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या ठिकाणी शेवाळ आणि चिखल यांच्यामुळे कोणताही अपघात होऊ शकतो. तसेच जंगलातील रस्ते माहित नसल्याने जंगलात अडकून पडण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यासाठी पर्यटकांनी जंगलात अजिबात प्रवेश करू नये, वनखात्याकडून ठिकठिकाणी नाके उभारुन पर्यटकांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही पर्यटक आडमार्गाने जंगलात प्रवेश करत आहेत. हे धोकादायक आहे. भीमगड अभयारण्य असल्याकारणाने प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. याची पर्यटकांनी नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले.









