कणकवली/दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्तीस बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदरची कार्यवाही करण्यात आली आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई हे सदर मोहिमेकरिता मुख्य समन्वयक म्हणून काम पाहणार असून सदरचे आदेश 30 जून 2025 पर्यंत वैध राहणार आहेत. प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने सदरच्या ओंकार या नर हत्तीस बेशुद्ध करून पकडून तज्ञांच्या सल्ल्याने सदर हत्तीच्या पुनर्वसनाची योग्य ती व्यवस्था करावी, असेही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
सरपंच सेवा संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रवीण नारायण गवस यांनी कर्नाटक राज्यातील खानापूर या ठिकाणी हत्ती पकड मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम व हत्ती परत येऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी 7 मार्च 2025 रोजी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व इतरांनी उपोषण केले होते. मुख्य वनसंरक्षक (प्रा) कोल्हापूर यांनी उपोषणकर्त्यांशी आमदार दीपक केसरकर, विधानसभा सदस्य आणि पालकमंत्र्यांची स्वीय सहाय्यक मनीष दळवी यांच्यासमवेत चर्चा केली. सदर चर्चेमध्ये उपोषणकर्ते यांनी हत्ती पकड मोहीम राबविणेबाबत निर्णय घेऊन 15 दिवसांच्या आत शासनास सविस्तर प्रस्ताव पाठवावा आणि हत्ती पकड मोहिमेची जबाबदारी पालकमंत्री नीतेश राणे यांच्यावर सोपवून उपोषण मागे घेतले होते.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी 20 मार्च रोजी उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांना श्री. गवस याचे मागणीनुसार दोडामार्ग तालुक्यातील वन्यहत्तींना बेशुद्ध कऊन प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने पकडून इतर ठिकाणी पाठविण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुषंगाने उप वनसंरक्षक, सावंतवाडी यांनी दोडामार्ग तालुक्यातील वन्यहत्तींपासून होणारा उपद्रव तसेच हत्तींचा हल्ला होऊन मनुष्यहानीसारख्या घटना टाळण्यासाठी आक्रमक तीन नर हत्तींना पकडणे आवश्यक असल्याचे कळवून त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक (प्रा) कोल्हापूर यांचे कार्यालयास सादर केलेला होता.
हत्ती दोडामार्ग तालुक्यामध्ये दिवसाच्या वेळी जंगलामध्ये वास्तव्य करतात, तर रात्री व पहाटेच्या वेळी आसपासच्या परिसरात असलेल्या फळबागा, फळपिकांचे, भातशेती व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. काही प्रकरणी हत्ती मनुष्यप्राण्यांचा पाठलाग केल्याने व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यामुळे हत्तींना पकडून स्थलांतरीत करण्यात यावे, अशा तीव्र भावना देखील त्यांनी वारंवार व्यक्त केल्या आहेत. सन 2019 ते 24 दरम्यान हत्तींनी तिघांना गंभीर जखमी केले होते. तर 8 एप्रिल 2025 रोजी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण गवस यांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात हत्तींचे तीन गट फिरत असून त्यातील पहिल्या गटात एकूण चार हत्ती, दुसऱ्या व तिसऱ्या गटात प्रत्येकी एक नर हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वावरत आहेत. त्याचबरोबर मागील वर्षापर्यंतवरील मादी बरोबर आणखी दोन पिल्ले (एक नर व मादी) फिरत होती. यावर्षी सदर दोन्ही पिल्ले मादीपासून वेगळी होऊन कोल्हापूर जिह्यामध्ये स्वतंत्रपणे वावरत आहेत. यातील मादी हत्ती ही यावर्षी वारंवार आंबोली परिक्षेत्रामध्ये आढळत आहे. तर नर हत्ती हा स्वतंत्रपणे वावरत असुन तो सध्या दोडामार्गमध्ये दाखल झालेला आहे.
या दुर्घटनांसोबतच लोकवस्तीच्या जवळ या हत्तीचा वाढता यावर यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच मानव–वन्यहत्ती संघर्ष देखील वाढत आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना वारंवार लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच उपोषणादरम्यान, पालकमंत्री नीतेश राणे यांनी सदर हत्तींना पकडून हत्ती कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सादर करण्यात आलेल्या प्रस्तावान्वये सदरची परवानगी देण्यात आली आहे.








