खानापूर तालुक्यातील सातनाळी भागात हत्ती ठाण मांडून : शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
वार्ताहर /रामनगर
खानापूर तालुक्यातील सातनाळी येथे गेल्या 20-22 दिवसापासून हत्तीने थैमान घातले असून येथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान चालूच आहे. सातनाळीबरोबरच माचाळी, मांजर पै भागात दिवसरात्र हत्ती फिरतच आहे. यामुळे नागरिकांनाही बाहेर फिरणे शक्य नाही. हत्तीच्या बंदोबस्तासाठी लोंढा फॉरेस्ट विभाग इतर कामे सोडून फटाके व गरबेल (बॉम्ब) घेवून हुसकावण्याचा प्रयत्न करतात. परंतु सदर हत्ती याला न घाबरता नुकसानच करतच आहे. याबाबत लोंढा फॉरेस्ट रेंज ऑफीसर नागराज भिमगोळ यांना विचारले असता ते म्हणाले, सदर हंगामात हा हत्ती या भागात येत असतो. याला या भागात भरपूर प्रमाणात खाद्य व पाणी मिळते. यामुळे तो येथेच ठाण मांडून आहे. ज्यावेळी या भागातील खाद्य संपेल त्यावेळी तो जाईल, असे सांगण्यात आले. शुक्रवारी 40 हून अधिक कर्मचारी त्याला पिटाळून लावण्यासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी येणारा हत्ती दुसरा होता. तो 2 ते 4 दिवसच राहून जात होता.
परंतु आता आलेला हत्ती दुसरा आहे व तो अधिक काळ येथेच दिसत आहे. तो नागरिकांवर धावून येत आहे. यावेळी बोलताना सातनाळीचे स्थानिक लिडर रामचंद्र गावकर म्हणाले, सातनाळी भागातून हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांना विचारले असता बेळगाव जिल्ह्यात सर्वत्रच हत्ती आले आहेत. ते आपल्या आपणच जाणार असल्याचे उत्तर मिळाले. सदर हत्तीsने एखाद्याचा जीव घेतल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उभा राहीला आहे. यानंतर बोलताना युवा नेता सुमित कसार्लेकर म्हणाले, सातनाळी, माचाळी आदी भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हत्तीच्या भीतीपोटी सायंकाळी घराबाहेर कोण पडत नाही. गेल्या 22 दिवसापासून वनविभाग फक्त फटाकेच वाजविण्याचे काम करत आहे. तेही स्थानिक जनतेकडूनच. येणाऱ्या दोन दिवसात कायमस्वरूपी हत्तीचा बंदोबस्त न केल्यास फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी व्यक्त केला.