सातनाळी-माचाळी भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : भात-ऊसपीक उद्ध्वस्त
खानापूर : लोंढा वनविभागातील सातनाळी, माचाळी येथे एका जंगली हत्तीने गेल्या 25 दिवसांपासून ठाण मांडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऊस आणि भात सुगी हंगाम सुरू असल्याने शेतकरी या हत्तीमुळे हतबल झाले आहेत. गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून या हत्तीने सातनाळी, माचाळी भागात ठाण मांडल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली असून शेतकऱ्यांची सर्व सुगीची कामे खोळंबली आहेत. हा हत्ती कळपातून बाजूला होऊन या भागात विसावला आहे. हत्ती दिवसभर शेतात रहात असल्याने भात आणि ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या हत्तीला जंगलात पाठवण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच लोंढा वन विभागाकडूनही हा हत्ती जंगलात परतवून लावण्यासाठी गेल्या काही दिवसापासून सातत्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत. हत्तीला परत जंगलात पाठवण्यासाठी लेंढा वन विभागाकडून दोन पथके तयार केली आहेत. एक पथक दिवसभर हत्तीच्या मागे लोकांच्या सुरक्षेसाठी रहात आहे. तर सायंकाळी दुसरे पथक या हत्तीच्या पाळथीवर आहे.
फटाके, बंदुकीचे बार काढून या हत्तीला पुन्हा जंगलात घालवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा हत्ती अजिबात आपल्या विजनवासात जाण्यास तयार नसल्याने वनखातेही हतबल झाले आहे. वनखात्याकडून सातनाळी, माचाळी परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना वनखात्याकडून करण्यात आली आहे. नागरिकांना या हत्तीला बिथरवण्याचा प्रयत्न करू नये, हत्ती बिथरल्यास तो मनुष्यावर चाल करून येण्याचा धोका संभवतो. यासाठी नागरिकांनी कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन वनखात्याकडून करण्यात येत आहे. या परिसरातील ऊस शक्मय होईल तितक्मया लवकर खानापूर साखर कारखान्याने वाहतूक करावा. त्यामुळे हत्तीला लपण्याची जागाही मिळणार नाही. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांनी प्रयत्न करून या भागातील उसाची उचल तातडीने करावी, त्यामुळे हत्तीला हुसकावून लावण्यास मदत होणार आहे. यासाठी भाग्यलक्ष्मी साखर कारखाने या भागात जादा टोळ्या देऊन तातडीने या भागातील संपूर्ण उसाची उचल केल्यास हत्तीचा बंदोबस्त करण्यात यश येईल, असे वनखात्याकडून सांगण्यात येत आहे. या हत्तीमुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेल्या भात पिकासह ऊस पिकाचीही नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.









