सेवानिवृत्त पेन्शन लागू करा, इतर मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेळगाव : वनखात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा लागू करा, आदी मागण्यांसाठी मंगळवारी कर्नाटक राज्य वनखाते निवृत्त कर्मचारी संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले. विविध मागण्यांसाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात निषेध नेंदविला. वनखात्यामध्ये सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावी, 15 फेब्रुवारी 2013 ते 22 एप्रिल 2014 या कालावधीतील वेतनवाढ देण्यात यावी, त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विमा लागू करावा, वनखात्याचे कर्मचारी, डोंगर आणि वन्यप्रदेशात सेवा करतात अशावेळी त्यांच्या जीवाला वन्यप्राण्यांपासून धोका असतो. यासाठी आरोग्य विमा योजना लागू करावी, अशी मागणी केली आहे. बेंगळुरात छेडलेल्या आंदोलनादरम्यान वनकर्मचाऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र अद्याप या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.त्यामुळे मंगळवारी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवत मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली आहे.









