कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने बुधवारी फॉरेन्सिकच्या पथकाने घेतले. सुमारे पाच तास नमुने घेण्याचे काम सुरु होते. याचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्यात येणार आहे. कोरटकरसोबतच आणखी चार जणांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. कोरटकर व सावंत यांच्यात झालेल्या संभाषणाची स्क्रिप्ट तयार करुन त्या आधारे हे सॅम्पल घेतले आहेत.
प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याच्या आवाजाचे नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
- रात्रीत पाच तास चौकशी
प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी कोरटकरची चौकशी सुरु केली. रात्री 3 वाजेपर्यंत चौकशी करुन पुन्हा पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास दोन तास चौकशी करण्यात आली. यामध्ये कोरटकरने विविध प्रश्नांची उत्तरे दिली असून, यातून बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
- डेटा स्वत:च केला डिलीट
या चौकशीमध्ये इंद्रजित सावंत यांना फोन कोणी केला, मोबाईलमधील डाटा कोणी डिलीट केला, यासह अनेक प्रश्न विचारले. सावंत यांना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास फोन केल्याचे कोरटकरने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मोबाईलमधील डेटा स्वत:च डिलीट केल्याची कबुलीही त्याने दिली.
- ना मोबाईल, ना ऑनलाईन पेमेंट
17 मार्चला न्यायालयाने अंतरिम जामिन फेटाळल्यानंतर कोरटकर हैद्राबाद, चेन्नईकडे जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान त्याला तेलंगणामधून अटक केली. 17 ते 24 मार्च दरम्यान कोरटकरने मोबाईल फोन वापरला नाही. तसेच ऑनलाईन पेमेंट होऊ नये याची दक्षता घेतल्याची माहिती मिळाली आहे. मोबाईल आणि ऑनलाईन पेमेंटवरुन पोलीस आपला माग काढू शकतात अशी भिती त्याला होती.
- प्रवासात घालवला वेळ
17 मार्चनंतर कोरटकरने बहुतांशी वेळ हा प्रवासातच घालवला. एका खासगी कारमधून तो महाराष्ट्र बॉर्डर ओलांडून गेला. यानंतर तो एका गावामध्ये राहिला आणि नंतर पुन्हा प्रवास करुन तो हैद्राबादमार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होता. मात्र तत्पूर्वीच त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.
- कोरटकरच्या जेवणाचीही तपासणी
प्रशांन कोरटकरला इतर आरोपींप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. सुरक्षिततेचा भाग म्हणून कोरटकरला देण्यात येणारे जेवण, नाष्टा याची तपासणी होत आहे. कोरटकरचा मुक्काम सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. शीघ्र कृती दलाची एक तुकडी 24 तास बंदोबस्तासाठी ठेवली आहे.
- तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज द्या
प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडी कालावधीतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी बुधवारी करण्यात आली आहे. तीन दिवसाच्या चोवीस तासाच्या सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी इंद्रजित सावंत यांनी अर्जाद्वारे केली आहे.
- कोरटकर- सावंत संभाषणाच्या स्क्रिप्टचे वाचन
फॉरेन्सिकच्या संगणक व ध्वनी विश्लेषण विभागाचे दोन अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आवाजाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु होती. यावेळी कोरटकरसह पाच जणांच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करुन घेतले. कोरटकर व इंद्रजित सावंत यांच्यातील संभाषणाची स्क्रिप्ट तयार करुन ती पुन्हा कोरटकरला वाचण्यास सांगितली. लॅपटॉपवर हे नमुने घेऊन हे पथक परत गेले.








