वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांचा बांगलादेश दौरा 9 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर तेथील हिंदूंवर इस्लामी धर्मांधांकडून अत्याचार केले जात आहेत. तेथील परिस्थिती गंभीर असून तिची पाहणी करण्यासाठी हा दौरा होणार आहे.
या दौऱ्याची माहिती विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. विक्रम मिस्री हे आपल्या या दौऱ्यात बांगला देशच्या विदेश विभाग सचिवांची भेट घेणार आहेत. त्यांच्याकडून ते तेथील परिस्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीसंबंधी भारताची चिंता आणि संताप ते बांगला देशाच्या प्रशासनाच्या कानावर घालणार आहेत. बांगलादेशात हिंदू नेते चिन्मोय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर भारताने तेथील परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दास यांच्यावर नि:पक्षपातीपणाने आणि पारदर्शीपणाने अभियोग चालविला जाईल, अशी अपेक्षा जयस्वाल यांनी व्यक्त केली.
प्रक्षोभक भाषेवर आक्षेप
बांगलादेशात धर्मांध नेत्यांकडून प्रक्षोभक भाषेचा उपयोग तेथील अल्पसंख्याकांच्या विरोधात, विशेषत: तेथील हिंदू नागरिकांच्या विरोधात करीत आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कृतींविरोधात तेथील प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी भारताची अपेक्षा असून भारताने ती बांगलादेशच्या कानावर घातली आहे. तेथील धार्मिक नेत्यांच्या प्रक्षोभक भाषेमुळे हिंदूंवरील अत्याचारांमध्ये अधिकच वाढ होत आहे. बांगलादेशने हा हिंसाचार त्वरित थांबविला नाही, तर भारताने त्या देशावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता भारतातूनही होत आहे. भारत या संदर्भात स्वस्थ बसल्यास चुकीचा संदेश जगात जाईल. तसेच बांगलादेशातल्या धर्मांधांना अधिकच चेव चढेल, असा इशाराही अनेक मान्यवरांनी दिला आहे. भारताच्या विदेश व्यवहार सचिवांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर स्थिती अधिक स्पष्ट होईल आणि भारतालाही नेमके काय केले पाहिजे, याची जाणीव होईल, असे मानले जात आहे.









