राष्ट्रीय खेळाडूंवरही लक्ष्मीची कृपा : परदेशींना दरमहा 60 ते 80 हजार तर राष्ट्रीय फुटबॉलपटूंना दरमहा 40 ते 50 हजार रुपये मिळणार, फुटबॉल हंगामासाठी परदेशी खेळाडूंसाठी साडे तीन ते चार लाख रुपये मिळणार
संग्राम काटकर/कोल्हापूर
यंदाच्या कोल्हापुरी फुटबॉल हंगामात बलवान वरिष्ठ संघांमधून तब्बल 18 परदेशी व 9 राष्ट्रीय खेळाडूंचा जलवा शौकिनांना पाहण्यास मिळणार आहे. कोल्हापूरी फुटबॉलच्या इतिहासात जास्तीत संख्येने परदेशी व राष्ट्रीय खेळाडू खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. परदेशी व राष्ट्रीय खेळाडूंना संघात स्थान देतेवेळी त्यांच्या स्कीलप्रमाणे संघ व्यवस्थापनाने मोठा धनवर्षावही केला आहे. तो करताना दरमहा 60 ते 80 हजार तर राष्ट्रीय खेळाडूंना दरमहा 30 ते 50 हजार रुपये देण्याचे पक्के करुन त्यांची केएसएकडे नोंदणीही केली आहे. गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत 10 ते 20 हजार जादा मागितलेल्या या महागड्य़ा खेळाडूंचा दीड महिने शोध सुरु होता. शिवाय आपल्या संघातून कोणते परदेशी, राष्ट्रीय खेळाडू खेळणार आहेत याची गुप्तता पाळून त्यांच्या ट्रायल्सही अज्ञातस्थळीच घेतल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019-20 सालचा छत्रपती शाहू स्टेडियममधील फुटबॉल हंगाम मार्च महिन्यात थांबवला होता. त्यामुळे विविध संघातून खेळत असलेल्या 13 परदेशी, 13 राष्ट्रीय व 15 राज्यस्तरीय खेळाडूंना कोल्हापुरातून माघारी जावे लागले. गतवर्षी फुटबॉल हंगाम झाला. पण कोरोनामुळे परदेशी खेळाडूंना केएसएने नो-एंट्री केली होती. त्यामुळे सर्व 16 संघांनी स्थानिक खेळाडूंचीच मोट बांधून हंगाम खेळला. शिवाय कोरोनाचे कारण सांगत खेळाडूंना थोडीशी रक्कम देऊन संघात हंगामात खेळण्यास राजी केले होते. जुनमध्ये फुटबॉल हंगाम संपल्याच्या वेळीच मात्र बलवान वरिष्ठ संघांनी यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी ताकदवर संघ बांधण्याचे पक्के केले होते.
मधल्या काळात संघ बांधणीसाठी विविध माध्यमातून 12 ते 15 लाख रुपयांची जुळणी केली. दसऱ्यानंतर खऱया अर्थाने संघ बांधणी सुरु झाली. परदेशी व राष्ट्रीय खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्याशी संघातून खेळण्यासंदर्भात चर्चा रंगू लागली. या चर्चेत खेळाडूंनी केलेल्या पैशाची मागणी पाहून संघ व्यवस्थापन हडबडून गेले. पण तरीही बारगेनिंग करुन परदेशी खेळाडूंना दरमहा 60 ते 80 हजार तर राष्ट्रीय खेळाडूंना दरमहा 40 ते 50 हजार रुपये घेण्यास राजी करुन त्यांना आपल्या संघात स्थान दिले. त्यामुळे आता सर्वच संघ पुर्वीच्या तुलनेत अधिकच ताकदवर झाले आहेत.
हंगामात संघांनी परदेशी व राष्ट्रीय खेळाडूंना दिलेल्या पैशाचा तपशील असा
संघाचे नाव खेळाडूचेनाव शहर-देशाचे नाव संघातर्फे दरमहा मिळणारेपैसे
पाटाकडील तालीम मंडळ ः
व्हिक्टर जॅक्सन नायजेरिया 70 हजार रुपये
ऍण्ड्रीओ गॅलिचो नायजेरिया 60 हजार रुपये
मोहमद खान मुंबई 40 हजार रुपये
प्रॅक्टीस फुटबॉल क्लब ः
ट्रोह जुलेस सेसर आयव्हरी कोस्टा 70 हजार रुपये
चिमा इनोसंट नायजेरिया 70 हजार रुपये
राष्ट्रीय खेळाडू अमित बिस्वास कोलकाता 50 हजार रुपये
बालगोपाल तालीम मंडळ
व्हिक्टर मेविगे नायजेरिया 70 हजार रुपये
तेलव्हिन मोमोह नायजेरिया 65 हजार रुपये
परमजितसिंग पंजाब 40 हजार रुपये
बीजीएम स्पोर्टस् ः
एन. डी. ओपेरा नायजेरिया 65 हजार रुपये
हमीद बॅलोगोन नायजेरिया) 65 हजार रुपये
फ्रॅन्सिस सग्मा नागालॅण्ड) 40 हजार रुपये
खंडोबा तालीम मंडळ
अबूबकर अलहसन नायजेरिया 80 हजार रुपये
मायकल सेपा (घाणा) 75 हजार रुपये
तामिळनाडू किंवा गोव्यातील राष्ट्रीय खेळाडूची नोंदणी केली जाणार आहे.
दिलबहार तालीम मंडळ
इमॅन्युअल इचीबेरी (नायजेरिया) 65 हजार रुपये
संडे ओबे (नायजेरिया) 50 हजार रुपये
प्रमोद पांडे (मुंबई) 40 हजार रुपये
संयुक्त जुना बुधवार पेठ ः
रिचमोन ओलुसोला अवेटी (घाणा) 60 हजार रुपये
डॉम्निक दादे आयव्हरी कोस्टा 50 हजार रुपये
राष्ट्रीय अब्दुल अन्सारी (नागपूर) 30 हजार रुपये
–फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने दोन परदेशी व एक राष्ट्रीय खेळाडूला संघात देण्याचे ठरवले आहे. त्यांच्याकडील स्कीलची पाहणीही केली आहे, असे प्रशिक्षक अजित वाडेकर यांनी सांगितले.
शिवाजी मंडळाकडूनही नायजेरियन खेळणार…
गतवर्षीच्या फुटबॉल हंगामावर वर्चस्व मिळवलेल्या शिवाजी तरुण मंडळानेही यंदाच्या हंगामासाठी नायजेरियन खेळाडू करीम ओम्जेलो व ऑर्थर कॉसी व गोवा राष्ट्रीय खेळाडू सिमरल फर्नाडीस यांना संघात स्थान दिले आहे. पण हे खेळाडू दरमहा किती पैसे घेणार आहेत, याची माहिती देणे आम्हाला योग्य वाटत नाही, असे संघाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.









