मागील दोन महिन्यातील आकडेवारी : बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्री
मुंबई :
गेल्या दोन महिन्यात, विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. विशेषत: बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी विक्री होत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये 60,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाजारातून काढून घेण्यात आली आहे. अशी घटना घडण्यामध्ये कमाई वाढीच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत आणि जगभरातील आर्थिक परिस्थिती कमकुवत होत आहे, ज्यामुळे घाबरलेले गुंतवणूकदार पैसे काढू लागले आहेत.
एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, जुलै 2025 मध्ये एफआयआयने बँका आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये सुमारे 5,900 कोटी रुपयांची विक्री केली. ऑगस्टमध्ये हा आकडा 23,288 कोटी रुपयांपर्यंत वाढला. त्याच वेळी, आयटी क्षेत्राची स्थितीही वेगळी नाही. जुलैमध्ये एफआयआयने 19,901 कोटी रुपयांचे आयटी शेअर्स विकले. ऑगस्टमध्येही त्यांनी 11,285 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
आयटी क्षेत्र का नुकसानीत?
एचएसबीसीच्या अहवालानुसार, टेक कंपन्या सध्या जागतिक मंदीचा सामना करत आहेत. जगभरात आयटी सेवांची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. यामुळेच गुंतवणूकदारांना या शेअर्समधून कमी परतावा मिळण्याची भीती वाटत आहे आणि ते पैसे काढत आहेत.
बाजारपेठेतील मागणी मंदावली
तीव्र स्पर्धेमुळे कंपन्यांच्या वाढीवर दबाव आहे. नफाकमाईचे अंदाज सतत कमी केले जात आहेत. गेल्या 11 महिन्यांपैकी 6 महिन्यात एफआयआयने त्यांचे होल्डिंग कमी केले आहे. सलग 5 तिमाहीत, कंपनीचा महसूल फक्त एक अंकात वाढला आहे, तर पूर्वी तो दरवर्षी 25 टक्क्यांपर्यंत वाढत होता.









