पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी ट्रंप यांचा महत्वपूर्ण निर्णय, अदानींला दिलासा शक्य
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेचा दौऱ्याचा प्रारंभ 12 फेब्रुवारीपासून होत आहे. त्यांच्या या दौऱ्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेचा ‘विदेशातील भ्रष्टाचार विरोधी कायदा’ रद्द केला आहे. याच कायद्याच्या अंतर्गत भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी उद्योगसमूहाविरोधात अमेरिकेत अभियोग सादर करण्यात आला आहे. आता हा कायदा रद्द झाल्याने अदानींना दिलासा मिळणे शक्य आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी या संबंधात अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना अनेक आदेश दिले आहेत. या कायद्याच्या अंतर्गत आतापर्यंत जे निर्णय देण्यात आले आहेत, त्यांची समीक्षा करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. ज्या अमेरिकन नागरीकांच्या विरोधात विदेशात भ्रष्टाचार केल्याचा किंवा विदेशात लाचलुचपत केल्याचा आरोप आहे, त्यांच्यावर अभियोगाची कारवाई रोखली जावी, असे ट्रंप यांनी स्पष्ट केले आहे. ट्रंप यांच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम शक्य आहेत.
अदानी प्रकरण काय आहे ?
गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योगसमूहातील अन्य अधिकारी यांनी अमेरिकेत भांडवलाची उभारणी केली होती. मात्र, या भांडवलातून मिळालेल्या रकमेचा उपयोग त्यांनी भारतात विविध सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी आणि त्यांच्याकडून सौरवीज निर्मितीची कंत्राटे मिळविण्यासाठी केला, असा आरोप अमेरिकेत पूर्वी असणाऱ्या बायडेन प्रशासनाने केला होता. अदानींना त्यासंबंधी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाने समन्सही काढले होते. अदानी यांनी त्यांच्यावरील आरोपांचा ठाम इन्कार करताना कोणतीही लाचलुचपत झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. आता ट्रंप प्रशासनाने हा कायदा रद्द केल्याने आणि त्याच्या अंतर्गत सादर करण्यात आलेल्या प्रकरणांचा पुनर्आढावा घेण्याचा आदेश दिल्याने अदानी यांना दिलासा मिळू शकतो, असे काही कायदेतज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप
अदानी यांच्यावर अमेरिकेत अभियोग सादर करण्यात आल्यानंतर भारतातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आरोपांचे काहूर माजविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध आहेत. ते अदानी यांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. अदानी यांची चौकशी संसदेच्या संयुक्त समितीकडून व्हावी, अशा अनेक मागण्या विरोधकांनी केल्या होत्या. संसदेची दोन अधिकवेशने या गेंधळात वाया गेली होती.
ट्रंप यांच्या निर्णयाचा परिणाम
ट्रंप यांनी हा कायदा रद्द करण्याचा आदेश दिल्याने माठे परिणाम होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवर भारतात जे आरोप सातत्याने केले जात आहेत. त्यांच्यातील हवा काढून घेण्याचे काय ट्रंप यांच्या या निर्णयामुळे होऊ शकते, अशी चर्चा आहे. अमेरिकेत अदानी यांच्या विरोधात जो अभियोग सादर करण्यात आला आहे, त्यासंबंधीचा कोणताही पुरावा अमेरिकेच्या मागच्या प्रशासनाला सादर करता आला नव्हता, अशीही चर्चा आहे. त्यामुळे हा अभियोग केवळ दबावतंत्र म्हणून सादर करण्यात आला होता का, अशी शंका त्यावेळीही उपस्थित करण्यात आली होती. आता ट्रंप यांच्या निर्णयामुळे परिस्थिती परिवर्तीत होणार आहे, अशीही चर्चा केली जात आहे.
बायडेन प्रशासनाच्याच चौकशीची मागणी
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहातील अनेक खासदारांनी या कायद्यासंदर्भात मागच्या जेसेफ बायडेन यांच्या प्रशासनाचीच चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात या खासदारांनी अमेरिकेच्या अॅटर्नी जनरलना पत्र पाठविले आहे. भारत हा अमेरिकेचा महत्वाचा भागीदार आहे. या कायद्याअंतर्गत जो अभियोग सादर करण्यात आला आहे, तो अमेरिका आणि भारत यांच्या जवळीकीच्या संबंधांमध्ये अडथळा निर्माण करणारा आहे. हा अभियोग हेतुपुरस्सर सादर करण्यात आला आहे काय, याची चौकशी करावी, अशी मागणी या खासदारांनी अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना पत्र पाठवून केली आहे. लान्स गुडेन, पॅट फॉलन, माईक हॅरिडोपोलस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमन्स आणि ब्रायन बेबिन अशी हे पत्र पाठविणाऱ्या अमेरिकन खासदारांची नावे आहेत. अदानींवर जो अभियोग सादर करण्यात आला आहे, त्यात कोठेही लाच दिली गेल्याचा किंवा लाचेचा प्रस्ताव दिला गेल्याचा स्पष्ट आरोप नाही, या महत्वपूर्ण बाबीकडेही अनेक तज्ञांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे हा अभियोग सादर करण्याचा हेतू केवळ कोणाचीतरी कोंडी करण्याचा होता का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
ट्रंप आदेशाचे दूरगामी परिणाम
ड ट्रंप यांच्या आदेशामुळे परिस्थितीत परिवर्तन होण्याची दाट शक्यता
ड अदानींच्या विरोधातील अमेरिकेतील अभियोगाचे भवितव्य अनिश्चित
ड भारत-अमेरिका संबंधांमध्ये बाधा आणण्यासाठीच अभियोग : आरोप
ड येत्या काही दिवसांमध्ये या संबंधातील चित्र अधिक स्पष्ट होणे शक्य









