वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय मुष्टीयुद्ध संघासाठी प्रख्यात विदेशी प्रशिक्षक दिमित्री दिमित्रुकास यांची नियुक्तीची घोषणा अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेतर्फे मंगळवारी करण्यात आली. भारतीय मुष्टीयुद्ध संघटना आणि विदेशी प्रशिक्षक दिमित्रुकास यांच्यात दोन वर्षांचा करार झाला आहे.
आयरिश अॅथलेटिक्स मुष्टीयुद्ध संघटनेचे दिमित्रुकास यापूर्वी हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत आयरिश राष्ट्रीय कनिष्ठ आणि युवा संघांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. आता आगामी आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धांसाठी दिमित्रुकास यांचे भारताच्या पुरुष आणि महिला मुष्टीयोद्ध्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. आगामी विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अधिक दर्जेदार होण्यासाठी दिमित्रुकास प्रयत्नशील राहतील. अलीकडच्या काही कालावधीमध्ये मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकारात भारताने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारतीय मुष्टीयोद्ध्यांमध्ये चांगली क्षमता दिसत असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध झाल्याबद्दल दिमित्रुकास यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आयर्लंडच्या विविध वयोगटातील मुष्टीयोद्ध्यांना सुमारे गेली 12 वर्षे 47 वर्षीय दिमित्रुकास यांचे मार्गदर्शन मिळाल्याने आयर्लंडच्या मुष्टीयोद्ध्यांचा दर्जा निश्चितच वाढला आहे. जागतिक दर्जाचा मुष्टीयोद्धा जो वॉर्ड याने 2015 आणि 2017 च्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियन स्पर्धेत रौप्यपदके तर 2019 च्या युरोपियन स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या ग्रेनी वॉल्श यांना दिमित्रुकास यांचे मार्गदर्शन लाभले होते. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयर्लंड मुष्टीयुद्ध प्रशिक्षक वर्गामध्ये दिमित्रुकास यांचे स्थान महत्त्वाचे होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अजय सिंग यांनी भारतीय मुष्टीयुद्ध संघाला विदेशी प्रशिक्षक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले असल्याची घोषणा केली. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय मुष्टीयुद्ध संघाला पदकांची आशा बाळगता येईल.









