कराड / प्रतिनिधी :
कराडच्या शिंदे मळ्यातील डॉक्टर राजेश मारूती शिंदे यांच्या बंगल्यावर सोमवारी पहाटे जबरी चोरी झाली. सात ते आठ दरोडेखोरांनी डॉक्टर शिंदे यांना चाकूचा धाक दाखवत रोकडसह सोने पळवले. या घटनेनंतर जिल्ह्यातील पोलीस दल कराडात दाखल झाले आहे. अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जबरी चोरीचा अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला आहे.
शिंदे यांच्या बंगल्यावरील चोरीनंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके कामाला लावली आहेत. डॉक्टर शिंदे यांच्या कुटूंबातील सदस्यांकडून नेमकी घटना कशी घडली याबाबत माहिती घेतली जात आहे. अपर अधिक्षक बापू बांगर, डिवायएसपी अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, कराड शहर पोलिसांचे पथक, कराड तालुका पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहे. दरोडेखोरांच्या हालचालीवरून तपासाची दिशा ठरवली जात आहे. शिंदे यांचा बंगला हा शिंदे मळ्यात असून बंगल्याच्या भोवती सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही, संरक्षक भिंती आहेत. तरीही चोरी झाल्याने पोलिसांनी आपले कसब पणाला लावले आहे.