मार्लेश्वर धबधबा येथील घटना, पती, सासू-सासऱयासह भोंदू बाबावर गुन्हा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुलगा होत नसल्याने पती व सासू-सासऱयांनी मार्लेश्वर धबधबा येथे महिलेला सर्वांसमोर विवस्त्र स्नान करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े या प्रकरणी महिलेकडून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा पती, सासू-सासरे व विवस्त्र स्नान करण्याचा सल्ला देणाऱया भोंदू बाबाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पुण्यातील एका व्यावसायिकाबरोबर विवाह झाला होत़ा 2013 पासून वंशाला दिवा हवा म्हणून मुलाला जन्म देण्यासाठी या महिलेवर दबाव टाकण्यात येत होत़ा महिलेला मुलगा न होण्यामागे आपल्यावर कुणीतरी काळी जादू (ब्लॅक मॅजिक) अथवा करणी केली असावी, असा समज तिचे सासू-सासरे व पतीचा झाल़ा त्यानुसार काळी जादू दूर करण्यासह व मुलगा होण्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिह्यातील जयसिंगपूर येथील एका भोंदू बाबाचा सल्ला घेण्यास सुरूवात केल़ी
या भोंदू बाबाने पीडित महिलेच्या कुटुंबियांना पूजा, होमहवन करण्याचा सल्ला दिल़ा त्यानुसार या कुटुंबाने पुण्यातील आंबेगाव बुद्रुक या त्यांच्या घरी पूजा होमहवन केल़े आपल्या आकुर्डी, शिरोळ व इंदापूर आदी कार्यालयातही पूजाअर्चा केल़ी त्याच्या सल्ल्यानुसार पीडित महिला व तिच्या कुटुंबियांकडून विधी करण्यात आल़े यानंतरही महिलेला मूल न झाल्याने या भोंदू बाबाने मुलगा होण्यासाठी पीडित महिलेने धबधब्याखाली सर्वांसमोर नग्न होऊन आंघोळ करावी, असा अजब सल्ला दिल़ा त्यानुसार पीडित महिला आपल्या पतीसोबत संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर धबधबा येथे आली होत़ी या ठिकाणी तिच्या पतीने तिला विवस्त्र होऊन आंघोळ करण्यास भाग पाडल़े या प्रकारानंतर पीडित महिलेने पुण्यात गेल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल़ी आपल्या पतीने आपली बनावट सही करून 75 लाख रुपयांचे कर्ज उचलले असून आपले दागिनेही व्यवसायासाठी गहाण ठेवल्याचे तक्रारीत नमूद केले आह़े
या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा 38 वर्षीय पती, 62 वर्षीय सासू, 64 वर्षीय सासरे यांच्याविरूद्ध 498, 420, 406, 323 व बाबा जमादार (रा. कोल्हापूर) या भोंदू बाबावर महाराष्ट्र जादूटोणा व अघोरी कृत्यविरोधी कायदा 2013 नुसार गुन्हा दाखल केला आह़े पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.









