अडीच लाख रोख व 30 तोळे सोने लंपास; कागल शहरात भीतीचे वातावरण; श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण
कागल / प्रतिनिधी
येथील विसावा धाब्यासमोरील दत्त कॉलनीतील एका घरात जबरी घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरुममधील दोन तिजोरीचे लॉक तोडले व त्यातील अडीच लाख रुपये रोख व सुमारे 30 तोळे सोने असा सुमारे 18 लाखांचा ऐवज लंपास केला. रत्ना मेडिकलचे मालक शंकर कृष्णात घाटगे यांच्या घरात ही चोरी झाली. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. कागल पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र श्वानपथक परिसरातच घुटमळले. पोलीस सीसीटीव्हीच्याद्वारे कसून तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची माहिती अशी, येथील शंकर घाटगे हे दत्त कॉलनीमध्ये रत्नाई निवास या घरात सहकुटुंब राहतात. त्यांच्या शेजारील बंगल्यात त्यांचे बंधू सचिन तर थोरले बंधू संग्राम हे मटण मार्केट परिसरातील घरात राहतात. शनिवारी संग्राम हे घरातील सर्व महिलांना व मुलांना घेऊन आंबा येथे सहलीसाठी गेले होते. रात्री मेडिकल दुकान बंद करून शंकर घाटगे घरी आले. त्यानंतर जुन्या घरात आई एकटीच असल्याने रात्री बारा वाजता ते घराला कुलूप लावून तेथे गेले. शेजारच्या बंगल्यात त्यांचे वडील व भाऊ सचिन होते. रात्री चोरट्यांनी शेजारील प्लॉटमधून कंपाऊंडवरून उडी मारून अंगणात प्रवेश केला. त्यानंतर कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील दोन तिजोरी कटावणीने तोडून त्यातील रोख अडीच लाख रुपये व सुमारे 30 तोळ्dयांचे सोन्याचे दागिने असा सुमारे 17 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, त्यांचे वडील सकाळी लवकर उठले. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी लहान तिजोरीतील 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम, 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची सोन्याची साडेतीन तोळ्dयांची चेन, मोठ्या तिजोरीतील 4 लाख रुपये किंमतीचे आठ तोळ्dयांचे सोन्याचे गंठण, 3 लाख रुपये किंमतीच्या सहा तोळ्dयांच्या सोन्याच्या बांगड्या, 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, 40 हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे टॉप, 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे टॉप, 25 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, 2 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट दोन नग, 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दोन नग, 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल असलेले तीन मिनी गंठण, 75 हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण तीन जोड असा एकूण 17 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
कागल पोलिसांना ही घटना समजताच पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, विजय पाटील, विनायक औताडे, संदेश पोवार, बिरु रानगे, सुनिल कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले.
श्वानपथक गल्लीच्या एका कोपऱ्यावरच घुटमळले.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक विनायक सपाटे, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी शहरातील हनुमाननगर अपार्टमेंटमध्येही चोरीचा प्रयत्न केला.









