अध्याय अठ्ठाविसावा
उद्धवाला नामाबद्दल पुढे सांगताना भगवंत म्हणाले, माझे नाम घेणे हे माझे भजनच आहे. जो माझे नाम घेत असतो, माझी कीर्ती ऐकत असतो आणि सदैव माझ्याबद्दल विचार करत असतो तो माझेच रुप होऊन वावरत असतो. त्यामुळे तो करत असलेल्या हालचाली मीच करत असतो असे म्हणालास तरी चालेल. जो जागा असताना मनाने मला पहात असतो, त्याला स्वप्नात मीच दिसत असतो. त्याचे चित्त सतत माझेच चिंतन करत असल्याने त्याच्या चित्तात मीच भरून राहिलेला असतो. ह्याप्रमाणे जो माझ्या भजनात दंग असतो त्याचे त्रिगुण समसमान होऊन सर्व विकार मावळतात. त्यामुळे त्याचा अहंकार संपुष्टात येतो आणि विषयांबद्दल वाटणारी ओढ समूळ नष्ट होते. जे माझे निस्सीम भक्त असतात ते प्रारब्धानुसार वाट्याला आलेले भोग स्वत:वर पूर्ण ताबा ठेऊन भोगत असतात. त्यामुळे ते विषयांच्या कह्यात जात नाहीत. ते विषयांबद्दल निरासक्त कसे होतात, त्यांना विषयांच्या उपभोगाची ओढ कशी वाटत नाही असे विचारशील तर त्याचे कारण असे की, ते क्षणोक्षणी माझेच भजन करत असल्याने वाट्याला आलेल्या विषयातून आनंद घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. म्हणून ते त्यांच्या वाट्याला आलेले विषय मलाच अर्पण करून टाकतात आणि नित्यमुक्त होतात. हे गुपित ज्यांच्या लक्षात येत नाही. ते कुणीतरी सांगतंय म्हणून विषयांचा त्याग करण्यासाठी, त्यांच्याबद्दलची ओढ कमी होण्यासाठी नाना प्रयत्न करतात. परंतु हे करत असताना माझी प्राप्ती होण्यासाठी एक साधन म्हणून आपण विषयांचा त्याग करून बघूयात हा विचार त्यामागे असतो. अर्थातच हे काही त्यांनी स्वेच्छेने केलेले नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण ते माझी अहर्निशी माझी भक्ती करत नसल्याने मी त्याच्या चित्तात भरून राहिलेला नसतो. त्यामुळे त्यांच्या चित्तात विषयांचे विचार घोळत असतात. त्यांनी विषयांचा त्याग नाईलाजाने केलेला असल्याने विषयत्यागाचे बंधन त्यांना जाचक वाटत असते. नाईलाजाने स्वीकारलेल्या बंधनामुळे विषय भोगायला मिळत नसल्याचे त्यांना वाईट वाटत असते. त्यामुळे हे बंधनच त्यांना बाधक ठरते. थोडक्यात विषयांचा भोगच बंधन निर्माण करतो असे नव्हे तर केवळ त्याबद्दल केलेला विचारही माणसाला बंधनात अडकवतो. हे सगळं त्यांचा अहंकार नष्ट न झाल्यामुळे घडत असतं. आपण कर्ते नसून सर्व घडवून आणणारा ईश्वर आहे हे लक्षात न घेतल्याने विषयाबाबत अत्यंत प्रेम वाटून ते मी स्वबळावर प्राप्त करून घेऊन त्यांचा उपभोग घेईन अशा गैरसमजामुळे विषयभोग त्यांना अत्यंत प्रिय असतात. तेच त्यांना बाधक ठरतात. खरं म्हटलं तर विषय हे मिथ्या आणि मायिक आहेत परंतु साधकांनी जर चुकीची विचारसरणी अनुसरली तर ते त्यांना अत्यंत बाधक ठरतात. नक्की काय करायचं हे समजलं नाही की माणूस गोंधळून जातो आणि स्वत:हून अडचणीत येतो. एखाद्या वैद्याला रोगाचे लक्षण, धातुज्ञान, पथ्यपाणी, नाडीज्ञान ह्याची माहिती नसेल तर त्याने दिलेल्या औषधाने बरे वाटण्याऐवजी रोग बळावण्याची शक्यताच जास्त असते. त्याप्रमाणे विषयत्याग का करायचा आणि तो आपोआप कसा घडतो ह्याचे इंगित समजून न घेता, नुसता वरवरचा केलेला त्याग साधकाला बाधक ठरतो. हा एकप्रकारचा कुयोगच म्हणायचा. कुयोग म्हणायचे कारण म्हणजे भगवद्भजन न करता, वेदविधी न आचरता केलेला विषयत्याग निष्फळ ठरतो. मनात ईश्वराचा ठावठिकाणा नसताना केलेला त्यागाचा प्रयत्न काहीच साध्य करून देत नाही. उलट त्याने दामटून गप्प बसवलेली इंद्रिये उसळी मारून त्याला विषयभोगाकडे खेचून नेतात. काही साधक आम्ही अतिश्रेष्ठ असे राजयोगी आहोत असे म्हणून स्वत:ला जनकमहाराजांच्या बरोबरीचे समजतात व यथेच्छ विषयसेवन करतात. त्यांच्यासाठी वैराग्य हजारो कोस दूर राहते. हा कुयोगच नाहीतर काय?
क्रमश:








