सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनाही पसंती, संजू सॅमसन बाहेर, अश्विनलाही डावलले स्थान
प्रतिनिधी/ पल्लेकेले (श्रीलंका)
‘एनसीए’कडून तंदुऊस्तीचे मंजुरी प्रमाणपत्र मिळाल्याने के. एल. राहुलचा भारताच्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या 15 सदस्यीय हंगामी संघात समावेश करण्यात आला आहे. मांडीवरील शस्त्रक्रियेनंतर राहुल बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सावरलेला असून सध्या सुरू असलेल्या आशिया चषकासाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी श्रीलंकेला जाण्यापूर्वी त्याची तंदुरुस्ती तपासून पाहण्यासाठी एक अंतिम फेरी होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुलने सराव करताना जाळ्यात मोठ्या प्रमाणावर फलंदाजी केलेली असल्याने ‘एनसीए’ प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्या तंदुरुस्तीबद्दल काहीही शंका राहिलेली नाही. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याकरिता 5 सप्टेंबर रोजी ही अंतिम मुदत असली, तरी त्याच्या आधी 4 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा होणे अपेक्षित होते. पण निवड समितीने राहुलला तंदुरुस्तीसंदर्भात मान्यता मिळाल्यानंतर घोषणा करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकातही राहुलकडून यष्टिरक्षण सांभाळले जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर शनिवारी पल्लेकेले येथे पोहोचले होते आणि पावसामुळे रद्द झालेल्या पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यानंतर त्यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. इशान किशन हा संघातील दुसरा यष्टिरक्षक असून त्याने शनिवारी पाकिस्तानविऊद्ध 81 धावांची खेळी केली होती. याचा अर्थ संजू सॅमसनला आपले स्थान गमवावे लागेल. सॅमसन सध्या राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत श्रीलंकेत आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता न येऊनही सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळाले आहे. कर्णधार रोहितव्यतिरिक्त फलंदाजीत विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची निवड स्वाभाविक होती. त्यामुळे तिलक वर्माला बाहेर बसावे लागणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यामुळे आशिया चषकासाठीच्या भारतीय संघाचा भाग असलेल्या प्रसिद्ध कृष्णाला स्थान मिळालेले नाही.
फिरकी माऱ्याचे नेतृत्व डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव करेल. कुलदीप आणि रवींद्र जडेजा हे भारताचे पहिल्या पसंतीचे दोन फिरकी गोलंदाज असतील. तिसरा फिरकीपटू म्हणून डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला प्राधान्य देण्यात आले असून त्याच्यामुळे गरज पडल्यास फलंदाजीत थोडी अधिक बळकटी येईल, अशी निवड समितीची धारणा आहे. याभरात अनुभवी आर. अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांनी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 8 सामन्यांतून 12 बळी घेतले होते.
विश्वचषकासाठी भारताचा हंगामी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.









