देवचंद कॉलेज निपाणी येथे आयोजन : युवा समितीने दिली पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : सीमाभागातील बेरोजगार तरुणाईसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व म. ए. युवा समितीच्या माध्यमातून रविवार दि. 19 रोजी निपाणी येथे महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यातून 4 ते 5 हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, असा अंदाज म. ए. युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठी भाषिकांना कर्नाटकात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे म. ए. समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारकडे रोजगार मेळाव्याची मागणी केली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने निपाणी येथे रोजगार मेळावा होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देवचंद कॉलेज, अर्जुननगर, निपाणी येथे महारोजगार मेळावा होणार आहे. बीपीओ, एनजीओ, बँकिंग, हॉटेल, फायनान्स, आयटी, रिटेल, एज्युकेशन, हॉस्पिटल, हॉस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट, हेल्थकेअर, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इन्शुरन्स व सिक्युरिटी या क्षेत्रातील खासगी कंपन्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत 70 हून अधिक कंपन्यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या 865 गावांमधील 32 वर्षांपर्यंतच्या तरुणांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. पाचवीपासून पुढे कितीही शिकलेल्यांसाठी या मेळाव्यात संधी उपलब्ध असणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी सकाळी 8 वाजेपर्यंत देवचंद कॉलेजमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. आपल्यासोबत बायोडाटाच्या प्रति, फोटो, आधारकार्ड व गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. गावाचे नाव पाहूनच प्रवेश मिळणार असल्याचे युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले आहे. बेळगावमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रोजगार मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास यापुढेही असे मेळावे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, अजित पाटील, सुनील किराळे, दीपक पाटील, राजकुमार मेस्त्राr, अजय नार्वेकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन
सीमाभागातील मराठी भाषिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्जुननगर-निपाणी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महारोजगार मेळाव्याला बेळगाव, खानापूर, चिकोडीमधील इच्छुक विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे व रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.