ऑनलाईन टीम / मुंबई :
सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार आमदारांसह शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. कालच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी पवारांना प्रस्ताव दिला हेता. त्यावर आज शरद पवार निर्णय देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.
शरद पवार सध्या त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आहेत. थोडय़ाच वेळात ते वाय. बी. सेंटरवर पोहचतील. कालच अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवार आमचे दैवत असून, त्यांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना भेटलो. पक्ष एकसंघ कसा राहिल, याचा विचार पवारांनी करावा. तसेच आम्हाला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही पवारांना केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली होती. मात्र, मंत्र्यांच्या प्रस्तावावर पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत अजितदादा गटाच्या प्रस्तावावर शरद पवार निर्णय देणार की, आणखी कोणता राजकीय निर्णय या बैठकीत होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








