वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार वधारासह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. अदानी समूहाचे समभाग मोठय़ा प्रमाणामध्ये वधारताना पाहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 415 अंकांनी वधारत 60,224 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 117 अंकांनी वधारत 17,711 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. जागतिक सकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय शेअरबाजारावरही सकारात्मक दिसून आला. टाटा मोटर्स, एनटीपीसी, पॉवरग्रीड कॉर्प, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, रिलायन्स, आयटीसी, एचडीएफसी, विप्रो, टीसीएस, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचसीएल टेक यांच्या समभागांनी तेजी दर्शविली होती. आयटी व ऑटो क्षेत्रातील समभागांच्या दमदार कामगिरीचा फायदा शेअरबाजाराला सोमवारी झाला. ओएनजीसी आणि ऑईल इंडिया यांचे समभागसुद्धा 3 टक्के वधारत व्यवहार करत होते. एकंदरच या महिन्यामध्ये भारतीय शेअरबाजार गेल्या दोन सत्रामध्ये चांगली तेजी दाखवत आहे. सेन्सेक्स निर्देशांक दोन दिवसांमध्ये 1300 अंकांनी वधारत 60 हजारच्या टप्प्यावर पुन्हा परतला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अदानी समूहातील बऱयाचशा समभागांनी सोमवारी तेजी राखली होती. त्यामध्ये काही समभागांना तर अप्पर सर्किटसुद्धा लागले होते. समभागांनी पुन्हा सलग पाचव्या दिवशी वधारत गुंतवणूकदारांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
शेअरबाजारात गुंतवणूकदारांनी 5.5 लाख कोटी रुपयांची भर घातली असून एकूण बाजार भांडवल लिस्टेड कंपन्यांचे 265.5 लाख कोटी रुपये इतके सोमवारी वाढले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 5 पैसे वाढत 81.92 वर पोहोचला होता.









