सांगली :
राज्यात यंदा पहिल्यांदाच शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. बदलीसाठी अर्ज केलेल्या काही शिक्षकांनी अपील केले होते. त्यावर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सुनावणी देखील झाली. काहीच्या हरकती मान्य करून माहिती पुढे पाठविण्यात आली आहे.
शिक्षक बदली प्रक्रिया ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी असते. सोयीच्या बदलीसाठी शिक्षक आमदार, खासदार यांच्यापासून ते अगदी शिक्षणमंत्री यांच्यापर्यत फिल्डिंग लावतात. विविध प्रकारे प्रशासनावर दबाव आणला जातो. हा विषय केवळ सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशीची परिस्थिती असते. त्यामुळे शासनाने यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका खासगी कंपनीला बदलीचे काम देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून रिक्त पदांची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील काही जिल्ह्याची माहिती अद्ययावत होणे बाकी आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाच्यांकडील प्रणालीमध्ये माहिती उपलब्ध नाही. पुढील काही दिवसांत ही माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर सर्व माहिती ऑनलाईन दिसेल.
- वैद्यकीय प्रमाणपत्रांचे २५ प्रस्ताव अमान्य
शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची तालुका-पातळीवर कमिटी करण्यात आली होती. या कमिटीने गेल्या पंधरा दिवसांत कागदपत्रांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला नसणे, शासन निर्णयात आजाराचा समावेश नसणे, अशा कारणास्तव सुमारे २५ प्रस्ताव अमान्य करण्यात आले आहेत.








