वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील समुद्रात जगात प्रथमच हैड्रोजन इंधनावर नौका विहार करण्यात येणार आहे. वातावरणीय प्रदूषण वाढविणाऱ्या खनिज इंधनांपासून जगाला मुक्त करण्यासाठी हैड्रोजन इंधनाचा पर्याय विकसीत करण्यात येत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ही नौका 21 मीटर लांब असून तिला एमव्ही सी चेंज या नावाने संबोधण्यात येत आहे. या नौकेत 75 प्रवासी बसू शकतात. हा एक प्रायोगिक उपक्रम असल्याने पहिले सहा महिने हा नौका प्रवास विनामूल्य करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो जगात इतरत्रही केला जाऊ शकतो. हैड्रोजन इंधनामुळे विषारी वायूंचे उत्सर्जन वायुमंडलात होत नाही. त्यामुळे वायू प्रदूषणाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्वास आहे. सध्या हैड्रोजन इंधनाचा उत्पादन खर्च अधिक असल्याने हे इंधन सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. तसेच सर्व प्रकारची वाहने या इंधनावर चालू शकणार नाहीत, हे ही स्पष्ट आहे. मात्र, नजीकच्या भविष्यकाळात हैड्रोजन इंधनाचा उत्पादन खर्च बराच कमी होण्याची शक्यता आहे. तसेच वाहन तंत्रज्ञानातही सुधारणा होत असल्याने हे इंधन येत्या काही दशकांमध्ये उपयोग करण्याच्या व्यवहार्य पातळीवर येऊ शकेल, असेही संशोधकांचे मत आहे.
हैड्रोजन कार्सही होतील लोकप्रिय
हैड्रोजन इंधनावर चालणाऱ्या मोटारीही आता दिसू लागल्या आहेत. जपानच्या अनेक कार कंपन्यांनी आता कशा कारनिर्मितीत पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हैड्रोजन इंधन स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाते. आता ते सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरुपात निर्माण करणे हे मोठे आव्हान असून जगभरात यासंबंधी प्रायोग सुरु आहेत. भारतानेही स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांना प्रारंभ केला असून हैड्रोजन इंधनासंबंधी संशोधन येथेही होत आहे.









