प्रतिनिधी / बेळगाव
नागपंचमी अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपल्याने सणासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. नागपंचमीबरोबर निज श्रावण मासालादेखील प्रारंभ झाल्याने बाजारपेठेला बहर येऊ लागला आहे. विशेषत: नागपंचमीसाठी चिवड्याचे पोहे, शेंगदाणे, फुटाणे, गूळ, खोबरे, लाह्या आदींची मागणी वाढली आहे. त्यामुळे चिरमुरे, फुटाणे दुकानात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. सकाळपासूनच नागपंचमीच्या साहित्य खरेदीची लगबग पहावयास मिळत आहे. चिवडा पोहे व लाडू पोहे 70 रुपये किलो, भाजक्या शेंगा 150 ते 160 रुपये किलो, फुटाणे 80 ते 90 रुपये, चिरमुरे 6 रुपये लिटर, लाह्या 20 रुपये लिटर, त्याबरोबर गूळ 48 ते 50 रुपये किलो, विशेषत: चक्की गुळाला मागणी अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच साहित्याचे दर वाढले आहेत. भात दरात वाढ झाल्याने पोह्यांचे दरही वाढले आहेत. त्याबरोबर शेंगा, खोबरे आणि गुळाच्या दरातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नागपंचमीच्या साहित्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
नागपंचमीला नागमूर्तीची पूजन केली जाते. त्यामुळे विक्रीसाठी नागमूर्तीदेखील दाखल होऊ लागल्या आहेत. रंगीबेरंगी रंगामध्ये असणाऱ्या मूर्ती ग्राहकांना आकर्षित करू लागल्या आहेत. साधारण 30 ते 80 रुपयांपर्यंत या मूर्तींच्या किंमती आहेत. सोमवारी नागपंचमी, त्याबरोबर पहिला श्रावण सोमवार यामुळे बाजारात पुजेच्या साहित्याची आवकदेखील वाढली आहे. विशेषत: फळे, फुले व इतर साहित्यांना मागणी वाढू लागली आहे. नागपंचमीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी स्थानिक नागरिकांसह चंदगड, खानापूर आणि कोकणातील ग्राहकदेखील दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे चिरमुरे, फुटाण्याच्या दुकानातून गर्दी होऊ लागली आहे. सोमवारी नागपंचमी असली तरी चार दिवसापासून खरेदीची लगबग पहावयास मिळत आहे.
नागपंचमी अन् श्रावणासाठी बाजारपेठ सज्ज
सोमवारी नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार यामुळे बाजारपेठेला बहर आला आहे. विविध साहित्य दाखल झाले आहेत. त्यामुळे खरेदीची लगबगही पहायला मिळत आहे. एकूणच नागपंचमी आणि श्रावणासाठी बाजारपेठ सज्ज झालेले दिसत आहेत.









