कोल्हापूर : संग्राम काटकर
धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आणि शक्ती-भक्तीचे रूप असलेल्या नवदुर्गांचे कोल्हापूरला अधिष्ठान लाभले आहे. सर्वच नवदुर्गांची काळा पाषाणात बांधलेली मंदिरे कलेचा एक अप्रतिम नमुनाच बनला आहे. पूर्वीच्या काळी या नवादुर्गा कोल्हापूरच्या वेशीवर रक्षणकर्त्या म्हणून विराजमान होत्या. मात्र बदलत्या काळानुसार चोहो बाजूंनी वाढलेल्या लोकवस्तीमुळे नवदुर्गांचे वास्तव्य कोल्हापुरातील एका कुटुंबासारखे आकाराला आले. या नवदुर्गाचे करवीर निवासिनी अंबाबाईशी बहिणींचे नाते आहे. त्यांची आम्हावरी कृपादृष्टी आहे, असे आत्मिक समाधान कोल्हापूरकर मानत आले आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात नवदुर्गांचे दर्शन घेण्याला पुण्यकार्य मानले आहे. त्यामुळेच प्रत्येक नवरात्रोत्सवात नवदुर्गांचे दर्शन घेण्यासाठी लाखो मंदिरांमध्ये एकत्र येत असतात. दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची कोल्हापूरला एक प्रदक्षिणाही होऊन जाते. रविवार 15 पासून सुऊ होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गां, त्यांची महती व सेवेकऱ्यांच्या परंपरेवर टाकलेला हा प्रकाशझोत…
एकवीरादेवी मंदिर…
रविवार पेठ आझाद चौकात विराजमान असलेली ही आहे एकवीरादेवी. तिचे नवदुर्गाचे प्रथम स्थान आहे. एकांबिका प्रथमदुर्गा म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. देवीच्या शेजारी श्री दत्तभिक्षालिंग मंदिर आहे. साक्षात गुऊ श्री दत्तात्रयांचे स्थानच देवीजवळ असल्यो या स्थानाला ‘एकवीरादत‘ म्हणून ओळखले जाते. देवीला एकवीरादेवीबरोबरच रेणुका, यल्लम्मा, रामजननी, यमाई या नावाने ही ओळखले जाते. मंदिरात एक शिळा आहे. या शिळेवर रौप्य धातूचा देवीचा मुखवटा बसवला आहे. देवीच्या ठिकाणी जोतिर्लिंग व काळभैरव या परिवार देवता आहेत. मंदिराला अगस्ती ऋषी व लोपामुद्रा यांनी भेट दिल्याचा संदर्भ आढळतो. मंदिरात वेताच्या परड्यामध्ये मिठापिठाचा जोगवा घालवण्याची प्रथा आहे. अनेकजण देवीच्या दर्शनानंतर श्री जोतीर्लिंग, श्री काळभैरव, श्रीदत्तभिक्षालिंगाचेही दर्शन घेतात. आझाद चौकात वास्तव्य करत असलेले शिंदे परिवार एकवीरादेवीची सेवा करत आहे. सध्या पुजारी म्हणून केशव शिंदे हे कार्यरत आहे.
महाकाली मंदिर
महिषासुर मर्दिनी महाकालीदेवीचे वास्तव्य शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नरजवळ आहे. तिच्या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. हे मंदिर अंबाबाई मंदिराच्या समकालीन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात देवीची मूर्ती असून तिच्यासमोरच मोठा सभामंडप आहे. असुरांचा संहार करण्यासाठी झालेल्या युद्धात महाकालीदेवी अग्रभागी असायची. तीने युद्धात महिषासुराचा वध केला. मंदिरातील तिच्या परिवार देवतांमध्ये महादेव, रासाईदेवी, म्हसोबा, सिद्धीविनायक, दत्त, राम, हनुमान आदींच्या मूर्तींचा समावेश आहे. साक्षात नाथपंथींच्या समाधीही मंदिराच्या परिसरात पाहण्यास मिळतात. या देवीची गुरवांच्या सात कुटुंबांकडून सेवा केली जाते. पूजेसाठी प्रत्येक कुटुंबाला एक वर्षाचा कालावधी मिळतो. त्यानुसार जयदीप गुरव हे पुजारी म्हणून मंदिरात कार्यरत आहेत. नवरात्र उत्सवात पंचमीपासून सिमोलंघनपर्यंत देवीचा पालखी सोहळा होतो. अक्षय्य तृतीयेपासून महाकालीदेवीच्या उत्सवाला प्रारंभ केला जातो. महाकाली मंदिर आणि श्री महाकाली तालीम व भक्त मंडळाच्या वतीने महाकालीचा पालखी सोहळा साजरा कऊन उत्सवाची सांगता केली जाते.
मुक्तांबिका मंदिर…
मंगळवार पेठ, साठमारीला लागून विराजमान असलेली ही मुक्तांबिका तथा गजेंद्रलक्ष्मी देवी. दीड फुटी काळ्यात पाषाणात देवीची मूर्ती साकारली असून ती चर्तुभुज आहे. देवीचे दोन गुडघ्यावर असून त्यामध्ये मोक्षाचे प्रतिम बिल्व फळ धारण केले आहे. वरील दोन्ही हातात त्रिशुल व कमळ आहे. देवीच्या दोन्ही बाजूंना हत्ती असून त्यांनी देवीच्या मस्तकावर राजवैभवाचे प्रतिक म्हणून चवऱ्या धरल्या आहेत. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमंती करताना देवीच्या मंदिराला भेट दिल्याची माहिती आहे. देवीच्या परिवार देवांमधील मुक्तेश्वर महादेव, कुर्म, नृसिंह, वराह, वामन व मस्त्य आदींच्या मूर्तीही मंदिरात आहे. देवीच्या दर्शन हे मंदिराशेजारील क्षेत्रपाल भैरवाचे दर्शन घेतल्यानंतरच पूर्णत्व:ला जाते. देवीचे मंदिर स्वामी विवेकानंद आश्रमच्या आधिपत्याखाली आहे. गेल्या 3 पिढ्यांपासून माने परिवार देवीची पूजा-अर्चा करत आहे. सध्या वैभव माने हे पुजारी म्हणून कार्यरत आहेत.
अनुगामिनीदेवी मंदिर…
कर्नल विजयसिंह गायकवाड सरकारांच्या दुधाळी परिसरातील शेतवडीत अनुगामिनीदेवीचे मंदिर आहे. मंदिर हे राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बांधल्याचे सांगण्यात येते. अनुगामिनीला वनदेवता म्हणून ओळखले जाते. अंबाबाईने तिला रक्षक म्हणून संबोधले आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून तिला सहा हात आहेत. त्यापैकी दोन हात गुप्त अवस्थेत आहेत. तिच्या पदकमलाखाली राक्षस शरण आलेला दिसतो. मूर्तीच्या उजव्या हातात कमंडलू तर डाव्या हातात खडग आहे. तसेच एका हातात घंटा असून, युध्दाच्यावेळी ही देवता घंटानाद करत असे. त्यामुळे त्या नादाने राक्षस सैरावैरा धावत असे. युद्धात विविध अवतार व रूपे घेऊन राक्षसांचा संहार करणारी देवी म्हणून अनुगामिनीदेवीचा पराक्रम सांगितला जातो. तीने महापराक्रमी हसूरचा वध केला आहे. दैत्यांचा वध करून करवीरात मृत झालेल्या पाप्यास यमबाधा होवू नये, म्हणून मृतात्म्यांच्यामागे ही रक्षणाला जाते. म्हणून या देवीला अनुगामिनी म्हटले जाते. पाटील परिवारातील चौथी पिढी देवीची पूजा-अर्चा करत असून सध्या श्रीकांत पाटील (रा. जाऊळाचा गणपती मंदिराजवळ) हे पुजारी म्हणून सेवा करत आहे.
गजेंद्रलक्ष्मी मंदिर
कोल्हापुरात ठिकठिकाणी गजेंद्रलक्ष्मीची मंदिरे आहेत. तोरस्कर चौकातून ब्रम्हपुरीकडे गेले की उजव्या हाताला चर्च व मशिद दिसते. या दोन्हींच्या मधोमध डाव्या बाजूला दिसते ते म्हणजे श्री गजेंद्रलक्ष्मीदेवीचे मंदिर. मंदिर, मशीद व चर्च यामुळे ब्रम्हपुरी ही राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्शस्थान बनली आहे. गजेंद्रलक्ष्मीच्या मंदिरासारखे मंदिर अंबाबाई मंदिराच्या आवारातील तुळशी वृंदावनाजवळ आहे. साठमारीजवळील श्री मुक्तांबिकादेवीलाही गजेंद्रलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. श्री गजेंद्रलक्ष्मीची मूर्ती ही काळ्या पाषाणात कोरलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत. कमळात विराजमान आणि चर्तुभूज असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली सातारा कराड, पुणे व कनाटकातून भाविक येतात. नवरात्र उत्सवात तर मनोकामना व्यक्त करण्यासाठी आणि पूर्ण झालेल्या मनोकामनेबद्दल गजेंद्रलक्ष्मीला साडीचोळी व अन्य वस्तू अर्पण करण्यासाठी कर्नाटकातून भाविक येतात. गजेंद्रलक्ष्मीच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत. ते सोंडेत सुवर्ण कलश घेऊन गजेंद्रलक्ष्मीला अमृतजलाने महामस्तकाभिषेक करत आहेत. म्हणून तिला गजेंद्रलक्ष्मी हे नाव मिळाले. गेल्या आठ पिढ्यांपासून खतकर कुटुंब देवीची सेवा करत असून सध्या बाळासाहेब व त्यांचा मुलगा राजेंद्र हे दोघे देवीची सेवा करताहेत.
कमलजा मंदिर
शिवाजी पेठ, उभा मारुती चौकानजीक कमलजादेवीचे मंदिर आहे. करवीर महात्म्य उल्लेख असलेले हे मंदिर नृसिंह मंदिर म्हणून ओळखले जाते. गेल्या तीन पिढ्यांपासून उभा मारुती चौकानजीकचे राऊत कुटूंब कमलजादेवीची पूजा करताहेत. सध्या प्रसन्नजित राऊत हे देवीची सेवा करत आहेत. या मंदिराच्या अगदीच जवळ वरुणतीर्थ आहे. सध्या हे वरुणतीर्थ बुजवून तेथे गांधी मैदान तयार केले आहे. देवी कमळात विराजमान आहे म्हणून तिला कमलजा हे नाव देण्यात आले आहे. चर्तुभूज असलेल्या कमलजाला कमलांबा या नावाने ही ओळखले जाते. भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुरांशी युद्ध सुऊ केले. कमलजादेवी ही सिंहावर आरूढ होऊन युद्धाला आली. युद्धात तीने दुर्गासुराचा वध केला. यावर प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मदेवांनी कमलजादेवीची कमलपुष्पांनी महापूजा केली. तेव्हापासून ही देवता ‘गौरी कमलजा‘ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिच्या देवता परिवारात श्री नृसिंह, विठ्ठल-रूक्मिणी, महादेव, सूर्यनारायण, नागदेवता या देवतांचा समावेश आहेत. गेलेल्या पितरांच्या मुक्तीसाठी देवीची प्रार्थना केली जाते.
पद्मावती मंदिर
मंगळवार पेठ, जयप्रभा स्टुडिओपासून थोड्याच अंतरावर पद्मावतीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी पद्माळे नावाचे तळे होते. त्यामुळे मंदिर ठिकाणाला पद्मा अथवा पद्माळा या नावाने ओळखले जाते. पद्माळ्याला पद्मतीर्थ म्हणून ही संबोधल्याचे सांगण्यात येते. पद्मतीर्थाच्या काठावर भक्तप्रल्हादाने घोर तपश्चर्या करून नृसिंहदेवास प्रसन्न करून घेतले. त्यामुळे त्याचे पितृदोहाचे पाप नष्ट केले. तृतीय पापाचा नाश करणारे ठिकाणही म्हणून पद्मावती मंदिराकडे पाहिले जाते. पद्मावतीदेवी प्रकट होण्यामागे एका युद्धाचा संदर्भ आहे. हिरण्यकश्यपूचा वध नृसिंहाने केला. वध करताना नृसिंहाच्या शरिरात जी शक्ती कार्यरत होती, ती पद्मावती या नावाने प्रकट झाली. देवीच्या मंदिरातील परिवार देवतांमध्ये श्रीविष्णू, नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, श्रीगणेश, अगस्ती लोपामुद्रा, प्रल्हादेश्वर आदींच्या मूर्तीचा समावेश आहे. देवीची पूजाअर्चा गोपाळकृष्ण कालेकर व संजय हावळ हे दोघे करत आहेत. एक आड एक वर्ष याप्रमाणे या दोघांनी देवीची पूजाअर्चा करण्याची पध्दत आहे. सध्या गोपाळकृष्ण कालेकर हे देवीची पूजा करत आहे.
गजलक्ष्मी मंदिर
माळकर तिकटीहून पूर्वेच्या रस्त्यावरुन थोडे खाली गेले की वाटेतील खाटक्याची मंडई शेजारीच्या श्री गजलक्ष्मीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. एक विधीचा भाग म्हणून देवीच्या मूर्तीला भाविकांकडून शेंदूर लेपन केले जाते. देवीच्या मूर्तीजवळ दगडामध्ये कोरलेले दोन हत्ती आहेत. सर्व ऐहिक, परलौकीक संपत्तीची सागरस्वरूपी देवता म्हणून गजलक्ष्मीकडे पाहिले जात आहे. संपदा म्हणजे श्रीलक्ष्मी. ती सात्विक गुणांची प्रेरकशक्ती आहे. मायाशक्ती व लक्ष्मी दोहाचे अखंड रूप म्हणजे ही लक्ष्मीदेवीच होय. विष्णू व शक्तीचे अखंड रूप म्हणजे देखील श्रीलक्ष्मी होय. मंदिरातील देवीच्या रूपामध्ये लक्ष्मीरूप आढळते. या लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर रहावी यासाठी श्रावण व अश्वीन मासामध्ये अनेक भाविक गजलक्ष्मीच्या ठायी माथा ठेवण्यासाठी मंदिरात जात असतात. या मंदिराच्या परिसरात सध्या वैध मापनशास्त्र कार्यालय सुऊ आहे. सध्या शिला कोरवी (रा. पापाची तिकटी) व वैधमापनचे शिपाई संजय कारंडे हे देवीची पूजा करत आहेत.
फिरंगाईदेवी मंदिर
शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजच्या पिछाडीस फिरंगाईदेवीचे मंदिर आहे. तिचे पूर्वीचे नाव प्रत्यंगिरा होते. पूर्वीच्या काळी फिरंगाई मंदिरासमोर तळे होते. श्री आदिशक्तीचे संहारक रूप म्हणजे महाकाली आणि महाकालीच्या प्रत्याधिदेवतेचे प्रमुख रूप म्हणजेही प्रियंगाईदेवी. प्रियंगाई या नावाचा अपभ्रंश होऊन फिरंगाईदेवी नाव ऊढ झाले. मुसलमानी आमदानीत मुस्लिम भक्तांनी उपासना केल्यामुळे प्रियंगाई देवीला फिरंगाई म्हंटले जाते असेही सांगण्यात येते. या देवीचे मुळ ठिकाण बलूचिस्तानचे. देवीच्या बावन शक्तीपीठांपैकी एक हे मुळपीठ प्रसिद्ध आहे. प्रियंगाईदेवी ही सिंहास्वरुपीनी असून तिचे मुख किंवा कपाळावरील भाग सिंहाकृती आहे. बाकी सर्व शरीर मानवाकृती आहे. ती चतुर्भुज आहे. वरील हातात शंख व चक्र आहेत. काही ठिकाणी वरील दोन्ही हातात त्रिशुल व डमरु धारीणी म्हणूनही मानले आहे. खालील दोन्ही हातापैकी उजव्या हाती पानपात्र असून डाव्या हातात सर्प धारण केला आहे. परंपरेनुसार फिरंगाईदेवीची गुरवांची 8 कुटुंबे पूजा करत आले आहे. पुजेसाठी एका कुटुंबाला 1 वर्षाचा अवधी मिळतो. सध्या अभिषेक गुरव हे मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत.








