कल्याणकारी राज्यव्यवस्था किंवा वेलफेअर स्टेट ही संकल्पना अनेकांना माहीत आहे. भांडवलशाही देशांमध्ये गरीब आणि सर्वसामान्य समाजाच्या कल्याणासाठी काम होत नाही, असा आरोप स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे लोक करत असतात. तथापि, जपान हा एक असा देश आहे, की जो उघडपणे भांडवलशाही देश असूनही तेथे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे आणि भावनांकडे अतिशय सूक्ष्म लक्ष प्रशासनाकडून दिले जाते. असेच एक उदाहरण सध्या चर्चेचा विषय आहे.
जपान हा तंत्रवैज्ञानिक संशोधन आणि उद्योगात अग्रेसर देश आहे. त्यामुळे येथे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते. याच संदर्भातील हे उदाहरण आहे. या देशाच्या दुर्गम भागात क्यू-शिरातकी नामक एक गाव असून तेथे याच नावाने ओळखले जाणारे रेल्वे स्थानक होते. या गावात वास्तव्य करणाऱ्या काना हराडा नामक विद्यार्थिनीसाठी हे रेल्वे स्थानक कित्येक वर्षे चालविण्यात आले. तसेच या एका विद्यार्थिनीला घेण्यासाठी एक रेल्वेगाडी या स्थानकावर थांबत असे. या स्थानकावरुन इतर कोणताही प्रवासी चढत किंवा उतरत नसे. काना हराडा ही विद्यार्थिनी या गावातून शहरात शिक्षणासाठी जात असे. तिचे शिक्षण थांबू नये, म्हणून रेल्वे कंपनीने हे स्थानक तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत चालविले होते. तसेच तिच्या येण्याजाणाच्या वेळा लक्षात घेऊन येथे रेल्वे थांबविलीही जात असे.
मार्च 2016 मध्ये काना हराडा हिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानतंर त्वरित हे स्थानक बंद करण्यात आले. ही विद्यार्थिनी सामान्य परिस्थितीतील असल्याने शहरांमध्ये वसतीगृहांमध्ये राहून शिकण्याची क्षमता तिच्यात नव्हती. या रेल्वेस्थानकावर तिच्याशिवाय कोणी प्रवासीच नसल्याने ते बंद करण्यात आले असते, तर तिचा शहरात शिकण्याचा मार्गच बंद झाला असता. तथापि, तिची शैक्षणिक हानी होऊ नये, म्हणून जपानच्या रेल्वेकंपनीने तोटा होत असतानाही 2016 पर्यंत हे स्थानक चालविले. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बंद करण्यात आले. अशा प्रकारे शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळेच आज जपान तंत्रवैज्ञनिक क्षेत्रात इतर अनेक देशांपेक्षा अधिक आघाडीवर आहे.









