इनाम बडस-तुडये रस्त्यावरील वाणी गोंड नाल्यावर पूल उभारण्याची गरज : अनेकवेळा मागणी करूनही दुर्लक्ष : प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी
वार्ताहर /तुडये
तुडये (ता. चंदगड) ते इनाम बडस (ता. बेळगाव) आणि मोरब, बैलूर (ता. खानापूर) परिसराला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाणी गोंड येथील नाल्यावर पुलाची उभारणी करण्यासाठी बेळगाव सार्वजनिक विभागाने केलेल्या आजपर्यंतच्या दुर्लक्षामुळे गावांना ये-जा करण्याकरिता 15 कि. मी. चा फेरा मारण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. याठिकाणी पूल उभारण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. राकसकोप जलाशयाला आपल्या जमिनी कवडीमोल दराने देत दानशूरपणा दाखविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मात्र मोठे त्रासाचे बनले असून धोकादायक अशा आडीचा (साकव) सहारा घेत जीव धोक्यात घालत शेतीकामे करण्यासाठी जावे लागत आहे. क्कर्नाटक शासनाने राकसकोप जलाशय उभारणीनंतर तब्बल 61 वर्षे या पुलाच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. 1960 साली बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या उभारणीस सुरुवात झाली.
1962 साली प्रत्यक्ष पाणी अडविण्यात आल्यानंतर काठावरील पैलतिरी असलेल्या आपल्या जमिनीकडे कसे जावे, हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आणि आजवर तसाच राहिला आहे. तुडये ता. चंदगड गावच्या हद्दीतील मळवी हे गाव राकसकोप जलाशयाच्या क्षेत्राखाली बुडाले. शेजारील शेतजमिनीही बुडाल्या. मार्कंडेय नदी पात्रासभोवती असलेल्या निम्म्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नदी पलीकडे जाऊन शेती करणे त्रासाचे बनले आहे. इनाम बडस तसेच तुडये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिके घेण्याकरिता नाला ओलांडून ये-जा करावी लागते. वाणी गोंड या ठिकाणी दोन लाकडे आडवी टाकत त्यावर लाकडी पट्ट्या मारून दरवर्षी येथील श्रीधर मोहिते हे तात्पुरता साकव उभारतात आणि यावरूनच शेतकरी जीवघेणा प्रवास करतात. पिकांसाठी लागणारे खत किंवा औजारे आणताना शेतकऱ्यांना तुडये ते राकसकोप-बिजगर्णी, बेनट्टी, इनाम बडस असा 15 कि.मी. अंतराचा फेरा मारण्याची वेळ मागील 61 वर्षांपासून शेतकऱ्यांवर आली आहे. जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर मात्र हेच अंतर चार कि.मी. आहे.
तुडये-जांबोटी अंतर कमी होणार
स्वातंत्र्यानंतर जांबोटी, बैलूर, आमटे, कुसमळी, तोराळी, हबनहट्टी येथील ग्रामस्थ चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील बाजारात येत होते. सध्या जांबोटी हे खानापूर-बेळगाव-गोवा राज्याशी चांगल्या रस्त्यांनी जोडले गेले आहे. ठिकठिकाणी बाजार भरू लागल्याने या मार्गाचा वापर कमी झाला. याठिकाणी पुलाची उभारणी केल्यानंतर तुडये-जांबोटी अंतर कमी होणार आहे. गोवा येथे जाणाऱ्यांनाही हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.
बुडालेल्या मळवीवासियांसाठी आजपर्यंत एक रुपयाही निधी नाही
जलाशय उभारणीवेळी कोणत्याच सोयीसुविधा देण्याकडे पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. या जलाशयाखाली बुडालेल्या मळवीवासियांची घरे पाण्याखाली गेल्यानंतरही आजपर्यंत एक रुपयाही निधी नव्या मळवी गावासाठी बेळगाव प्रशासनाने दिला नाही. बेळगाव जिल्हाधिकारी यांनी याठिकाणची पाहणी करण्याचे आदेश सार्वजनिक विभागाला द्यावेत आणि याठिकाणी पुलाची उभारणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जलाशयात पाणी वाढल्यास वाहतूक बंद
राकसकोप जलाशयात पाणी साठविल्यानंतर वाणीगोंड येथील नाल्यावरील वाहतूक पुलाअभावी पावसाळ्यात बंद पडते. तुडये-मळवी येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या नाल्याच्या पलीकडे आहेत. याठिकाणी जाताना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते, याठिकाणी पुलाची उभारणी करण्याची गरज आहे.
– पुंडलिक हुलजी, शेतकरी तुडये
मंत्री लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी पुलाला मंजुरी मिळवून द्यावी
माझे कुटुंब मळवी येथे वास्तव्यास आहे. तर शेती जांभूळ-ओहळ नदीकाठी आहे. नाला पार करण्यासाठी स्वखर्चाने दोन लाकडी ओंडके नदीवर टाकून ये-जा करण्यासाठी आडी घालतो. आडीवरून जाताना धोक्याचे आहे. पावसाळ्यात लाकडावरून घसरल्यास सरळ खोल नाल्यात पडण्याची भीती असते. जिल्हा प्रशासन, महिला व बाल कल्याण विकासमंत्री लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी या पुलाला मंजुरी मिळवून द्यावी.
– श्रीधर मोहिते, शेतकरी, मळवी-इनाम बडस
वाणीगोंड येथे पूल उभारणीकडे आजही दुर्लक्ष
सध्या देशात गावे जोडण्यासाठी विविध ठिकाणी रस्ते, पुलांची उभारणी केली आहे. मात्र, तब्बल 61 वर्षांपासून इनाम बडस गावाशी महाराष्ट्रातील तुडये परिसराला जोडणारा वाणीगोंड येथील पूल उभारणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. इनाम बडस ते तुडये रस्त्याची सुधारणा करण्याची गरज आहे.
नम्रता पाटील, इनाम बडस (माजी ग्रा. पं. सदस्या, बेळवट्टी
पुनर्वसन मळवीची प्रत्यक्ष पाहणी करा
आम्ही राहती घरे व जमिनी जलाशयाला दिल्या. आम्ही बेघर झालो. इ. बडस, बेळवट्टी, बैलूर, मोरब, बाकमूर या गावातील नातलगांना भेटण्यासाठी व शिल्लक जागेतील पिके घेणे त्रासाचे बनले आहे. पुनर्वसन मळवीची प्रत्यक्ष पाहणी करून पूल उभारणी करा.
ओमाणा पाटील, ज्येष्ठ शेतकरी, मळवी









