शोधमोहीम सुरूच : विविध उपाययोजनेत अपयश : नागरिक भीतीच्या छायेखाली
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 24 दिवसांपासून रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेला बिबटय़ा अद्याप हाती लागला नाही. बिबटय़ाला शोधण्यासाठी विविध उपाय आणि आधुनिक तंत्र देखील अपयशी ठरले आहे. रेसकोर्स परिसरात वारंवार नजरेला पडत असलेला बिबटय़ा कधी हाती लागणार, हा प्रश्न वनखात्याला सतावू लागला आहे. त्याबरोबर परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बिबटय़ा कधी सापडतोय, याच विवंचनेत शहरवासीय आहेत.
आधुनिक कॅमेरे, प्रशिक्षित श्वान, हत्ती, जेसीबी, हनीट्रप आणि शेकडो कर्मचाऱयांच्या माध्यमातून बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र, चपळ बिबटय़ाने सातत्याने वनखात्याला चकवा दिला आहे. दरम्यान, हत्तीवरून शार्पशूटरच्या माध्यमातून निशाणा साधण्याचीही तयारी करण्यात आली होती. मात्र, बिबटय़ा नजरेला पडलाच नसल्याने शार्पशूटरची योजनाही वाया गेली आहे. त्यामुळे बिबटय़ाला आता कोणता उपाय करावा, या चिंतेत वनखाते आहे.
अडीचशे एकरचा परिसर पिंजून काढला
पोलीस आणि वनविभागाची संपूर्ण यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर असली तरी बिबटय़ाने हुलकावणी दिली आहे. शनिवारी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. संपूर्ण अडीचशे एकरचा परिसर कर्मचाऱयांनी पिंजून काढला. मात्र, हाताला काहीच लागले नाही.
त्यामुळे बिबटय़ा नजरेस पडतो मात्र सापडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी क्लब रोडवर बिबटय़ा वनखात्याच्या हातातून अलगद निसटला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा मिलिटरी विनायक मंदिरजवळ बिबटय़ाचे दर्शन झाले होते. तर शनिवारी रेसकोर्स परिसरात बिबटय़ा तलावात पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याचे ठसे मिळाले होते. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच असल्याचेही स्पष्ट होत आहे. शिवाय वारंवार चकवा देत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे एका बिबटय़ाने सर्व वनखात्याच्या यंत्रणेला हैराण केल्याचे दिसत आहे.
शोधमोहिमेसाठी लाखो रुपये खर्च
वनखात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला जेरबंद करा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, 24 दिवसांच्या कालावधीनंतरही बिबटय़ा मोकाटच असल्याचे पहायला मिळते आहे. बिबटय़ासाठी विविध उपाय राबविण्यात आले. हुक्केरीतील मुधोळ श्वान जातीचे पथक, त्याबरोबर शिमोगा येथील प्रशिक्षित हत्ती पथकही तळ ठोकून आहे. शिवाय वनखात्याचे शेकडो कर्मचारी देखील बिबटय़ाच्या मागावर आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेसाठी लाखो रुपये खर्ची घातले गेले. मात्र, प्रत्यक्षात बिबटय़ा अद्याप मोकाटच आहे. शिवाय एका बिबटय़ासाठी लाखो रुपये वाया गेले आहेत.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एकावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून वनखाते आणि पोलीस यंत्रणेने शोधमोहीम हाती घेतली आहे. या शोधमोहिमेसाठी आधुनिक ड्रोन कॅमेरे, हनीट्रप आणि इतर तंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र, 24 दिवसांनंतरही या शोधमोहिमेला यश आले नाही. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बिबटय़ाच्या धास्तीखालीच सण साजरा करावा लागणार का? या चिंतेत शहरवासीय आहेत. एकीकडे गणेशोत्सवासाठी लगबग सुरू आहे तर दुसरीकडे बिबटय़ाने डोकेदुखी वाढवली आहे.
राकेश अर्जुनवाड, आरएफओ, वनखाते
बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरू आहे. शनिवारी सर्व यंत्रणेनिशी रेसकोर्स परिसरातील निम्मा भाग पिंजून काढण्यात आला होता. दरम्यान, पावसामुळे अडथळा निर्माण झाला. रविवारी सकाळपासून शोध सुरू करण्यात आला आहे. पाऊस आणि चिखलामुळे पायाचे ठसे मिळणेही कठीण बनत आहे. मात्र, लवकरच बिबटय़ाला जेरबंद केले जाईल.
बिबटय़ासाठी रेसकोर्सच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
24 दिवस उलटले तरी बिबटय़ा सापडला नाही. त्यामुळे वनखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शिवाय नागरिकांना बिबटय़ाच्या भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकरिता काही महिलांनी रविवारी रेसकोर्सच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले. तसेच गेटवर चढून रेसकोर्स मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला.
एका बिबटय़ाला पकडण्यात शासन अपयशी ठरले आहे. मागील काही दिवसांपासून दहशत माजवलेला बिबटय़ा अद्याप सापडला नाही. शासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्यामुळे बिबटय़ा हाती लागला नाही. त्यामुळे वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे.









