कोल्हापूर / संग्राम काटकर :
शाळेचा दैनंदिन अभ्यास आणि पहाटेचा फुटबॉल खेळाचा सराव याचा योग्य ताळमेळ घालत महाराष्ट्र हायस्कूलमधील राष्ट्रीय फुटबॉलपटू सर्वेश आनंदा गवळीने नुकत्यात निकाल लागलेल्या दहावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. त्याने दहावी परीक्षेत 98 गुण मिळवले होते. 100 टक्क्यांसाठी 2 टक्कांची गरज होती. सर्वेशने राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघातून केलेल्या प्रतिनिधीत्वाची दखल घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने सर्वेशला 20 गुण बहाल केले. यापैकी 10 गुण सर्व्हेशने मिळालेल्या 98 टक्के गुणांमध्ये समाविष्ट केल्याने त्याला 100 टक्के प्राप्त झाले.
फुलेवाडी रिंगरोड येथील रहिवाशी असलेला सर्वेशचे वडील आनंदा गवळी हे भाई माधवराव बागल हायस्कूलमध्ये तर आई अनुराधा गवळी ह्या जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर दोनवडेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. सर्व्हेशला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड. आवडी पोटी तो मित्रांसोबत फुटबॉल खेळायचा. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होत राहिलेल्या फुटबॉल स्पर्धेत बॉलबॉईज म्हणून कार्यरत रहायचा. आपल्याकडील फुटबॉल कौशल्याच्या जोरावर सर्वेश हायस्कूलच्या संघात स्थानही मिळवायचा हायस्कूलच्या संघातून तो राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत खेळत रहायचा. परंतू राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी महाराष्ट्र संघ निवड चाचणीस सर्वेश कधी निवडला जात नव्हता. परंतू दहावीचे वर्षे त्याला फलदायी ठरले. नववीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून दहावीत प्रवेश केल्यानंतरही त्याने फुटबॉलचा सराव सुरुच ठेवला. महाराष्ट्र हायस्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या संघात स्थानही मिळवले. संघातून मनपास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धासुद्धा खेळत आपली छाप पाडली.
कोल्हापूरातच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वेशने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या खेळाची दखल घेऊन महाराष्ट्र संघ निवड समितीने त्याची महाराष्ट्र संघ निवड चाचणीसाठी निवड केली. पुण्यात झालेल्या चाचणीतही सर्वेशने आपल्याकडील फुटबॉलचे कौशल्य दाखवून देत महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत तो महाराष्ट्र संघातून उतरला. सुदैवाने महाराष्ट्र संघ या राष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिला. शिवाय सर्वेशने राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात मिळवलेले स्थान सत्कारणी लागले आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्याबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने सर्व्हेशला 20 गुण बहाल केले. यापैकी 10 गुण हे त्याने दहावी परीक्षेत मिळवलेल्या 98 टक्क्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे त्याचे 100 टक्के गुण झाले. या एकुणच कामगिरीबद्दल सर्व्हेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वेशला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य उदय आतकिरे, उपप्राचार्य एस. एस. मोरे, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, विजय पाटील, प्रशिक्षक संतोष पोवार, शरद मेढे व सूर्यजित घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
- दहावी आहे म्हणून खेळ थांबवला नाही…
सर्वेश फुटबॉल चांगला खेळतो हे आम्ही माहिती कऊन घेतले होते. त्याने दहावीत प्रवेश केला म्हणून त्याचे फुटबॉल खेळणे थांबवले नाही. प्रोत्साहनच दिले. सर्वेश रोज पहाटे साडे पाच वाजता सरावासाठी मैदानात जात असे. सकाळी 9 वाजता घरी येऊन पुन्हा तो शाळेत जात असे. शाळेतून घरी आल्याने मात्र तो केवळ आणि केवळ अभ्यासच करत होता. या अभ्यासामुळे सर्वेशला वेगळी शिकवणी लावण्याची गरज भासली नाही. आम्ही दिलेले प्रोत्साहन, अभ्यासात घेतलेले कष्ट आणि फुटबॉलमधील कामगिरी यामुळे सर्व्हेशला दहावी परीक्षेत 100 गुण मिळाले आहेत.
अनुराधा गवळी (सर्वेशची आई) व आनंदा गवळी (वडील)








