कोल्हापूर :
कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा किकऑफ नववर्षात होत आहे. केएसए फुटबॉल लीग स्पर्धेने हंगामास प्रारंभ होईल. 2 जानेवारी 2025 रोजी दुपारी दीड वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ आणि दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यामधील सामन्यांनी स्पर्धेस सुरुवात होईल. हंगाम शिस्तबद्ध होण्यासाठी केएसएने 44 नियमांची नियमावली प्रसिद्ध केली आहे. संघ, व्यवस्थापन, खेळाडू, प्रेक्षक, समर्थक यांनी नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केएसएकडून करण्यात आले आहे.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे मंगळवार 17 रोजी केएसए व ए डिव्हिजनमधील फुटबॉल संघ प्रतिनिधी यांची बैठक झाली. बैठकीमध्ये खेळाडू नोंदणी तक्रार, सीनियर सुपर 8 गट व सीनियर 8 गट, त्यांचे सामने, सामने काउंटडाऊन प्रमाणे वेळेत सुरू होणार, वेळेत उपस्थित नसणाऱ्या संघावर कारवाई करणे, सामन्यावेळी बेशिस्त वर्तन करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्यास कारवाई करणे, सामन्यावेळी संघांना ठरवून दिलेल्या ठिकाणीच वॉर्म अप करणे, कायदा व सुव्यवस्था या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, अशाप्रकारे 1 ते 44 नियमांचे वाचन करून निश्चित करण्यात आले. बैठकीला केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, फुटबॉल समिती सदस्य संभाजीराव मांगोरे–पाटील, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, प्रदीप साळोखे आदींसह सोळा संघांचे अध्यक्ष, सेक्रेटरी व संघव्यवस्थापक उपस्थित होते.
सोशल मीडियावर अक्षेपार्ह मजकूर टाकल्यास कारवाई
केएसएच्यावतीने रितसर परवानगीने होणाऱ्या फुटबॉल सामन्यांवेळी कार्यरत असणारे केएसए, पंच, सामना अधिकारी, रेफ्री अॅसेसर, संघ व खेळाडू यांच्याबाबत सोशल मीडियावर सर्व संघांचे पदाधिकारी व खेळाडू यांनी अक्षेपार्ह मजकूर टाकल्यास संबंधितांवर कारवाई व आर्थिक दंड करण्यात येणार आहे.
वेळेचे उल्लंघन केल्यास दहा हजार दंड सामन्यासाठी दिलेल्या वेळेचे उल्लंघन केल्यास संबंधित संघाला दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. दंडाची रक्कम संबंधित स्पर्धा संपण्यापुर्वी जमा करावी लागणार आहे, तरच पुढील स्पर्धेत खेळण्यास कारवाई झालेल्या संघास परवानगी दिली जाईल. तसेच दहा हजार पैकी वेळेत उपस्थित असणाऱ्या संघास पाच हजार रुपये दिले जाणार आहे.
हुल्लडबाजी केल्यास संघ सामन्यातून बाद
लिग स्पर्धेदरम्यान मैदानावर, मैदानाबाहेर, संघ, खेळाडू, समर्थक यांनी हुल्लडबाजी केल्यास करावाई करण्यात येणार आहे. सामन्यादरम्यान हुल्लडबाजी केल्यास संबंधित संघाला बाद करुन शुन्य गुण व गोल दिले जातील. विरुद्ध संघास विजयी करुन तीन गुण व तीन गोल दिले जातील. तीन पेक्षा अधिक गोल असल्यास प्रत्यक्षात झालेले गोल दिले जातील. तसेच पुढील एक स्पर्धा खेळण्यास बंदी घालण्यात येईल.
पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सुचना पुढीलप्रमाणे :
स्पर्धेमध्ये भाग घेणारे फुटबॉल संघ, खेळाडू व पदाधिकारी यांच्या नांवाची यादी पोलीस प्रशासनाकडे केएसएने सादर करावी.
स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व संघातील खेळाडू पदाधिकारी व पंच यांना आमचे नियमावलीबाबत मार्गदर्शन करावे. स्पर्धा मुदतीत वाद–विवाद होऊन कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामांची कल्पना संघांना द्यावी.
हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी केएसए कार्यालय परिसर, मैदान, स्टेडियममध्ये व बाहेरील बाजूस उत्कृष्ट कव्हरेज असलेले सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. एखाद्या घटनेनंतर त्याचे रेकॉर्डिंग पोलीस प्रशासनाकडे द्यावे.
समर्थक व प्रेक्षक यांच्यामध्ये गैरवर्तन झाल्यास त्या सामन्याच्या संघ व्यवस्थापनास जबाबदार धरणेत यावे.
ज्या खेळाडूंचेवर गुन्हे नोंद आहेत अशा खेळाडूंबाबत स्थानिक पोलीस ठाणेकडून वर्तणूक दाखला घेवून तो केएसएकडे सादर करावा.
केएसएकडे नोंदणीकृत असणाऱ्या संघांनी संस्थेचे धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रत केएसएमध्ये जमा करणे बंधनकारक आहे.








