वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत कुवेतविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी मैदानात प्रवेश करून सामनाधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याबद्दल त्यांच्यावर आता दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली असून त्यांना 500 अमेरिकन डॉलर्सचा दंड सॅफच्या शिस्तपालन समितीने ठोठावला आहे.
कुवेत आणि भारत यांच्यातील हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. दरम्यान या सामन्यावेळी प्रशिक्षक स्टिमॅक यांनी मैदानात प्रवेश करून सामनाधिकाऱ्याशी हुज्जत आणि वादविवाद केल्याने त्यांना पंचांनी लाल कार्ड दाखविले. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील 21 जून रोजी झालेल्या पाकविरुद्धच्या सामन्यातही स्टिमॅक यांना पंचांनी पहिल्यांदा लाल कार्ड दाखविले होते. कुवेत आणि भारत यांच्यातील हा सामना 27 जूनला झाला होता. सॅफ स्पर्धेच्या शिस्तपालन समितीसमोर या प्रकरणी स्टिमॅक यांनी आपला गुन्हा मान्य केला. 1999 साली फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाच्या अनुभवी स्टिमॅक यांनी कास्यपदक मिळवले होते. तसेच ते क्रोएशियन फुटबॉल संघाचे अनुभवी फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. या निर्णयामुळे स्टिमॅक यांना आता दोन सामन्यावेळी उपस्थित राहता येणार नाही. तसेच त्यांना 500 अमेरिकन डॉलर्स (41 हजार रुपये) दंड द्यावा लागणार असल्याची माहिती सॅफचे सचिव अन्वरुल हक यांनी दिली.









