पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हेगारी थोपविण्यासाठी पाऊल
बेळगाव : वाढते गुन्हे थोपविण्यासाठी पोलिसांनी फूट पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या सूचनेनुसार गेल्या दोन दिवसांपासून खडेबाजार पोलिसांनी या उपक्रमाला सुरुवात केली असून सायंकाळपासून रात्रीपर्यंत पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात अधिकारी व पोलीस पायपीट करताना दिसत आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी गेल्या तीन दिवसांपासून रोज सायंकाळी फूट पेट्रोलिंगसाठी बाहेर पडत आहेत. पहिल्या दिवशी खडक गल्ली, चांदू गल्ली परिसरात, दुसऱ्या दिवशी बुधवारी 29 जानेवारी रोजी शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर मंदिर परिसर, आठल्ये चाळ परिसरात पायपीट करण्यात आली. गुरुवारी 30 जानेवारी रोजी सायंकाळी भांदूर गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकरबाग परिसरात पायपीट करण्यात आली.
अनेक ठिकाणी प्रकाशाचीही व्यवस्था नाही. अंधाराचा फायदा घेत नशेबाज तरुण तेथे ठाण मांडतात. शिक्षण संस्थांच्या आवारातही व्यसन केले जाते. खेळांच्या मैदानाचा वापर व्यसनासाठी करण्यात येतो. हे सर्व प्रकार थोपवण्यासाठी प्रत्येक बोळांची तपासणी करण्यात येत आहे. काळ्यायादीतील गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या गल्ल्यांमधूनही पोलिसांचा फेरफटका सुरू आहे. वाढते गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने फूट पेट्रोलिंग करावे, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. खडेबाजार पोलिसांनी या सूचनेचे पालन सुरू केले आहे. पायपीट करताना नागरिकांशी संवाद साधून तेथील समस्याही जाणून घेण्यात येत आहेत. गुन्हेगारी कारवायांविषयी जर स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यास अशा गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. या नव्या उपक्रमामुळे गुन्हेगारी थोपविण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात शहरातील सर्वच अधिकाऱ्यांनी सहभागी झाल्यास आणखी प्रभावी ठरणार आहे.









