नागरिकांत भीतीचे वातावरण : शिळे अन्न टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील शिल्लक अन्न कचऱ्यामध्ये फेकत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तर कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रात्री ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मागील काही दिवसात अनेक जण जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असल्याने कुत्र्यांची पैदास कमी व्हावी यासाठी निर्बिजीकरण करण्यात येते. परंतु, बेळगावमध्ये निर्बिजीकरणाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याला अधिकाधिक शहरातील कचरा कारणीभूत आहे. उपनगरांमधील कुत्री शहराकडे वाटचाल करीत आहेत.
काही हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील शिल्लक अन्न, मांसाहारी खाद्यपदार्थ कचऱ्यामध्ये फेकतात. त्यामुळे कुत्र्यांचा अधिकाधिक ओढा कचऱ्यातील शिळ्या अन्नावर आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक हॉटेल्स तसेच रस्त्याशेजारील हातगाड्या आहेत. यावरील शिल्लक खाद्यपदार्थ कचऱ्यात फेकले जात असल्याने 30 ते 40 कुत्री कचरा परिसरात दिसून येतात. एखादे लहान मूल या कुत्र्यांच्या संपर्कात आले तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
मनपाने उपाययोजना करणे गरजेचे
अनेक वेळा सूचना करून देखील खाद्यपदार्थ कचराकुंडीच्या बाहेर टाकले जात आहेत. यामुळे धोका वाढला असून महापालिकेने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. नुकताच एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, रात्रीच्या वेळी कामत गल्ली कोपऱ्यावर 25 ते 30 कुत्री कचऱ्याच्या भोवताली फिरत असल्याची दिसत आहेत. त्यामुळे कचऱ्यामध्ये खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.









