मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रे यांनी दिली भेट : संबंधितांना सूचनाही केल्या
बेळगाव ; सरकाने इंदिरा कॅन्टीनकडे अधिक लक्ष द्या. गोर-गरीब जनतेला जेवण द्यावे, यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. देण्यात येणारा नास्टा तसेच जेवणाचा दर्जा देखील उत्तम ठेवा, असे सांगितले. त्यामुळे महापालिकेचे नूतन आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सोमवारी इंदिरा कॅन्टीनला भेट देवून पाहणी केली व संबंधितांना काही सूचना केल्या आहेत. शहरामध्ये कुली, हमाली कामगार तसेच गरिबांना कमी दरामध्ये नास्टा, जेवणाची सोय व्हावी यासाठी काँग्रेस सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले होते. एकूण शहरामध्ये सहा इंदिरा कॅन्टीन आहेत. त्या कॅन्टीनमध्ये उत्तम प्रकारे स्वच्छता ठेवा. ग्राहकांना उत्तम प्रतिचा नास्टा द्यावा, असे डॉ. नांद्रे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून सदर कॅन्टीन सुरू केली आहेत. सध्या काँग्रेसने त्याकडे पुन्हा गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली आहे. दररोज या कॅन्टीनमधून गोर-गरीब जनतेला जेवण, नास्टा दिला जात आहे.. मात्र त्याचा दर्जा तपासण्याची सूचना मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी डॉ. नांद्रे यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी काही कॅन्टीनला भेट देवून पाहणी केली.









