बीपीएल कुटुंबातील प्रतिव्यक्ती मिळणार 10 किलो तांदूळ : जानेवारीतील अतिरिक्त तांदूळ फेब्रुवारी महिन्यात देणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने घोषणा केल्यानुसार अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना प्रतिव्यक्ती अतिरिक्त 5 किलो तांदळाऐवजी 170 रुपये दिले जात होते. मात्र, आता फेब्रुवारीपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याऐवजी तांदूळ दिले जाणार आहेत. त्यामुळे या महिन्यापासूनच अन्नभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ मिळणार आहेत.
अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या हिश्श्यातील 5 किलोसह अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याची घोषणा करण्यात आली होती. नंतर अतिरिक्त तांदूळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे 5 किलो तांदूळ व अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या मोबदल्यात 170 रु. दिले जात होते. आता केंद्रीय गोदामातून पुरेसा तांदूळ उपलब्ध होत असल्याने एकूण 10 किलो तांदूळ वितरण करणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले आहे.
राज्यात 2023 मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर येताच पाच गॅरंटी योजना घोषित करण्यात आल्या होत्या. अन्नभाग्य योजनेंतर्गत जुलै 2023 पासून बीपीएल कुटुंबांना प्रतिव्यक्ती प्रतिकिलो 34 रु. प्रमाणे 5 किलो तांदळाचे 170 रु. डीबीटीमार्फत बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली. आता रक्कम जमा करणे स्थगित झाले आहे. अन्नभाग्यची नोव्हेंबर, डिसेंबर 2024 मधील बाकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. परंतु, जानेवारीमधील रकमेऐवजी फेब्रुवारी महिन्यात रेशनद्वारे अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. म्हणजेच या महिन्यात 15 किलो तांदूळ मिळेल.
दरमहा 190 कोटींची बचत
केंद्र सरकारने आपल्या गोदामातून राज्य सरकारला प्रतिकिलो 22.50 रु. दराने तांदूळ पुरवठा करण्यास संमती दर्शविली आहे. यामुळे राज्य सरकारला दरमहा 190 कोटी रुपयांची बचत होणार आहे. दीड वर्षापूर्वी अन्नभाग्य योजना सुरू झाल्यानंतर 34 रु. दर देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती. मात्र, केंद्र सरकारने तांदूळ पुरवठ्यास नकार दिला होता. त्यामुळे तितकीच रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता 22.50 रु. प्रतिकिलो दराने तांदूळ खरेदी करून पुरवठा केला जाणार असल्याने राज्य सरकारला मोठी बचत होणार आहे.
नव्या रेशनकार्डांसाठी अर्ज
राज्यात एकूण 1,53,76,472 रेशनकार्डे आहेत. त्यात 5,36,73,242 सदस्य आहेत. राज्यात 2023-24 या वर्षात आणि 2025 या वर्षात एकूण 2,30,549 नव्या रेशनकार्डांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी 1,58,000 कार्डे वितरित करण्यात आली आहेत, तर 65,437 अर्ज फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली आहे.









